बचाव पथकातील जिगरबाज "नायक' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

बचाव पथकातील नायकांनी अशक्‍यप्राय वाटणारी गोष्ट शक्‍य करून दाखवली आहे. नऊ दिवसांपासून गुहेत फसलेल्या मुलांचा आणि प्रशिक्षकाचा आवाज ब्रिटॉन जॉन वोलेन्थन यांनी पहिल्यांदा ऐकला.

बॅंकॉक : थायलंडच्या गुहेतून सर्व 12 मुले आणि त्यांच्या प्रशिक्षकास अनेक अडचणींवर मात करत सुखरूपपणे बाहेर काढले. आडवळणाचे रस्ते, दलदल, चिखल, काळोख पसरलेल्या गुहेतून मुलांना बाहेर काढणे हे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासारखेच होते.

एकीकडे मुसळधार पावसामुळे बचाव अभियानात येणारे अडथळे आणि दुसरीकडे अनेक मुलांना पोहता न येणे ही एक समस्या होती. ऑक्‍सिजनचे प्रमाणही कमी होते. अनंत अडचणी पाहता मुलांना बाहेर काढण्यास बराच काळ लागेल, असा कयास बांधला जात होता. मात्र, या अडचणींवर मात करत सर्वांना बाहेर काढले आणि तेही तीन दिवसांच्या आत. यामागे केवळ थायलंडचीच नाही तर परदेशातील टीमदेखील काम करत होत्या. 

बचाव पथकातील नायकांनी अशक्‍यप्राय वाटणारी गोष्ट शक्‍य करून दाखवली आहे. नऊ दिवसांपासून गुहेत फसलेल्या मुलांचा आणि प्रशिक्षकाचा आवाज ब्रिटॉन जॉन वोलेन्थन यांनी पहिल्यांदा ऐकला. थायलंड सरकारने ब्रिटनचे वोलेन्थन, रिचर्ड स्टेनटोन आणि रॉबर्ट चार्ल्स हार्पर यांना मदतीसाठी बोलावले होते. हे तिघे "गुहातज्ज्ञ' म्हणून ओळखले जातात. स्टेनटोन यांनी अग्निशामक दलात काम केले आहे. या तिघांनी नॉर्वे, फ्रान्स, मेक्‍सिको येथील बचाव मोहिमेतही सहभाग घेतला आहे. 

डॉ. रिचर्ड हॅरिस : ऑस्ट्रेलियाचे डॉ. रिचर्ड हॅरिस यांना पाणबुडीचा अनुभव आहे. त्यांनी गुहेतील मुलांची तपासणी केल्यानंतरच बचाव पथकाला काम करण्याची परवानगी दिली. नऊ दिवसांपासून उपाशीपोटी राहिल्याने मुले अशक्त झाली होती. त्यामुळे त्यांना पाणबुडीच्या माध्यमातून आणणे धोकादायक ठरणार होते. डॉ. हॅरिस यांनी ऑस्ट्रेलिया, चीन ख्रिसमस आयर्लंड आणि न्यूझीलंडच्या बचाव पथकात सहभागी झाले होते. 

बेन रेमेनॅंटस : बेल्जियमचे बेन रेमेनॅंटस हे फुकेटमध्ये डायव्हिंगचा व्यवसाय करतात. बचाव मोहिमेच्या पहिल्या दिवशी त्यांनी गुहेत मुलांना शोधून काढले. 

पासी : फिनलॅंडचे मिको पासी हे टेक्‍निकल डायव्हिंगमध्ये पारंगत आहेत. ज्या दिवशी ते बचाव मोहिमेत सहभागी झाले होते, त्या दिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. 
तसेच थायलंडचे नौदलाचे पाणबुडे समन कुनन यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय थायलंडचे इव्हान केर्दजी, कॅनडाचे एरिक ब्राऊन, थायलंड नौदलाचे डॉक्‍टरांचे पथक यांनीही बचाव पथकात मोलाची कामगिरी बजावली आहे. 

Web Title: in the rescue squad real HERO