मुस्लिम देशांविरुद्धच नवा स्थलांतर बंदी आदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

हा नवा आदेश जाहीर करण्यापूर्वी नाव न छापण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने फॉक्स न्यूजला त्याबाबत माहिती दिली.

वॉशिंग्टन- अमेरिकेत नव्याने तयार करण्यात आलेल्या स्थलांतर बंदी आदेशामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच सात मुस्लिमबहुल देशांना लक्ष्य केले आहे. यामध्ये केवळ आधीपासून अमेरिकेत जाण्याचा व्हिसा असणाऱ्या प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. 

अमेरिकेचा व्हिसा आहे, मात्र अद्याप एकदाही अमेरिकेत गेलेले नाहीत अशांनाही सूट मिळणार आहे. त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळू शकेल. 
अमेरिकेतील संघराज्य न्यायालयाने मूळ स्थलांतर आणि निर्वासित बंदी आदेशांना स्थगिती दिली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यामध्ये फेरबदल केले, मात्र इराण, इराक, सीरिया, येमेन, सोमालिया, सुदान आणि लिबिया या सात देशांना लक्ष्य करण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

ग्रीन कार्डधारक, तसेच अमेरिका आणि इतर कोणत्याही देशाचे दुहेरी नागरिकत्व असणाऱ्यांना या निर्बंधामधून सवलत देण्यात आली आहे. नव्या व्हिसा अर्जांच्या प्रक्रियेत सीरियन निर्वासितांना वेगळे काढून नाकारण्याचे कोणतेही निर्देश अद्याप नव्या मसुद्यामध्ये देण्यात आलेले नाहीत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 
हा नवा आदेश जाहीर करण्यापूर्वी नाव न छापण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने फॉक्स न्यूजला त्याबाबत माहिती दिली. आदेशावर स्वाक्षरी होण्यापूर्वी त्यामध्ये काही बदल होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या आठवड्यात नवा आदेश काढला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Revised travel ban targets same seven countries, exempts green card holders