कौतुक कोणाचं होतंय तर ते 'चोराचं'...

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

बीजिंगः जगभरात वेगवेगळ्या कारणांवरून अनेकांचे कौतुक सोहळे आपण पहात असतो. कौतुक करण्यासाठी काही तरी कारण हवे असते. पण... चोराचे कौतुक झालेले कोणी पाहिले आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय आहे. एका चोराचे जगभरातून कौतुक केले जात आहे.

जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होणार चोर आहे चीनमधील. हेयुआन शहरातील आयसीबीसी बँकेच्या एटीएममध्ये आलेल्या एका महिलेला चोराने चाकूचा धाक दाखवला. महिलने या चोराला 2500 युआन दिले. यानंतर चोर तिला एटीएम कार्ड स्वाइप करत बँक बॅलेन्स दाखवण्याची मागणी करतो. महिलेच्या खात्यात काहीच पैसे नसल्याचे पाहून चोराचे मन हेलावते आणि तो लुटलेले पैसे पुन्हा महिलेला परत करतो. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, चोर बँक बॅलेन्स पाहिल्यानंतर पैसे परत करतो आणि हसत-हसत तेथून निघून जाताना सीसीटीव्हीत दिसत आहे. चोराने मोठे मन दाखवले असले तरी पोलिसांपासून तो वाचू शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robber returns womans money after seeing her account balance this Video goes viral