युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांना धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine War

युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांना धार

किव्ह : युक्रेनचा पूर्व भाग ताब्यात घेतलेल्या रशियाला या भागावरील नियंत्रण कायम ठेवणे आव्हानात्मक ठरत असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. पूर्व भागातील काही युक्रेन समर्थक सशस्त्र गट रशियाच्या ताब्यातील पूल आणि रेल्वेगाड्यांवर हल्ले करत असून रशियाच्या अधिकाऱ्यांनाही ठार मारत आहेत. आज युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या ताब्यात गेलेल्या खारकिव्ह जिल्ह्यातील एक गावही पुन्हा ताब्यात घेतले.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १६७ वा दिवस होता. रशियाच्या अपेक्षेपेक्षा हे युद्ध बरेच लांबले असून आता युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांना धारही येत आहे. युक्रेनच्या पूर्व भागातील दोनेत्स्क प्रदेश रशियाच्या ताब्यात आला असला तरी त्यांना छुप्या पद्धतीने होणाऱ्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. युक्रेनला पाठिंबा असणारे काही सशस्त्र गट रशियाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले करत त्यांना मारून टाकत आहेत. तसेच, महत्त्वाचे पूलही उद्ध्वस्त करत आहेत. युक्रेनच्या सैनिकांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून मिळालेल्या क्षेपणास्त्राचा वापर करत रशियाच्या ताब्यात गेलेल्या खेरसन भागातील एक महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला होता. यासाठी या सशस्त्र गटांनी मदत केली होती. तसेच, रशियाच्या अधिकाऱ्यांना धमकी देणारी पत्रकेही रस्त्यांवर फेकली जात आहेत. रशियाच्या ताब्यातील खारकिव्ह जिल्ह्यातील एका गावावरही युक्रेनच्या सैनिकांनी पुन्हा नियंत्रण मिळवून आणखी काही गावांना वेढले.

अमेरिकेकडून आणखी मदत जाहीर

वॉशिंग्टन : अमेरिकेने युक्रेनला एक अब्ज डॉलरच्या लष्करी साहित्याची मदत करण्याची घोषणा केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रॉकेटआणि इतर शस्त्रांचा समावेश असेल. रशियाचे सैन्य बंदरांवर ताबा मिळविण्यासाठी हालचाली करत असल्याच्या अहवालानंतर हा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.