रशियानं काळ्या समुद्रात पाडलं अमेरिकी ड्रोन, दोन्ही देशांचे लष्कर अलर्ट I US Drone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Biden-Putin news

आम्ही रशियाचे राजदूत अनातोली अँटोनोव्ह यांना बोलावून तीव्र आक्षेप घेतला आहे. रशियातील अमेरिकेच्या राजदूत लिन ट्रेसी यांनीही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला कडक संदेश दिला आहे.

US Drone : रशियानं काळ्या समुद्रात पाडलं अमेरिकी ड्रोन, दोन्ही देशांचे लष्कर अलर्ट

युक्रेन युद्धाबाबत रशिया (Russia) आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाबाबत एक मोठी बातमी समोर आलीये. काळ्या समुद्रात रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन (American Drones) यांच्यात धडक झाल्याचं वृत्त आहे. ही माहिती अमेरिकेच्या लष्करानं (US Army) दिलीये.

दरम्यान, सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार एका रशियन फायटर जेटनं अमेरिकन एयरफोर्सच्या ड्रोनला खाली उतरण्यास भाग पाडलं. मंगळवारी काळा समुद्रावरील आकाशात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जेव्हा रशियन जेट विमान व अमेरिकन MQ-9 रीपर ड्रोन आमने-सामने आले.

रशियन जेटनं अमेरिकी ड्रोनच्या प्रोपेलरला नुकसान पोहोचवलं. ही घटना तेव्हा घडली जेव्हा अमेरिकेचा रीपर ड्रोन आणि रशियाचे दोन फायटर जेट SU-27 काळा समुद्राच्या वरती आंतरराष्ट्रीय जल सीमेत उड्डाण करत होते.

सीएनएननं अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगितलं की, यावेळी एक रशियन जेट जाणून बुजून अमेरिकी ड्रोनच्या समोर आले व जेटमधून ड्रोनवर तेल सांडू लागले. यावेळी दुसऱ्या जेटनं ड्रोनच्या प्रोपेलरला नुकसानग्रस्त केलं. हा प्रोपेलर ड्रोनच्या मागील बाजूस लागला होता. प्रोपेलर नुकसानग्रस्त झाल्यानंतर अमेरिकी लष्कराला आपले ड्रोन काळा समुद्रात उतरवणं भाग पडलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन लष्करी ड्रोन पडल्याच्या घटनेवर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, आम्ही रशियाचे राजदूत अनातोली अँटोनोव्ह यांना बोलावून तीव्र आक्षेप घेतला आहे. रशियातील अमेरिकेच्या राजदूत लिन ट्रेसी यांनीही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला कडक संदेश दिला आहे, असंही प्राइस यांनी सांगितलं.

अमेरिकन हवाई दलाचे अधिकारी जनरल जेम्स हेकर यांनी सांगितलं की, आमचे MQ-9 विमान आंतरराष्ट्रीय पाण्यातून नियमित उड्डाण करत होते. यादरम्यान रशियन जेट जाणूनबुजून अमेरिकन ड्रोनसमोर आले आणि टक्कर झाल्यानंतर ते काळ्या समुद्रात पडले. मानवरहित ड्रोनचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. काळा समुद्र हे क्षेत्र आहे, ज्याच्या सीमा रशिया आणि अमेरिका यांना मिळतात. युक्रेनच्या संदर्भात अनेक दिवसांपासून या भागात तणाव आहे.

टॅग्स :americaRussia