रशियाच्या कोरोना लशीला यश; एकही दुष्परिणाम झाला नसल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

जगात सर्वात आधी रशियाने लस तयार केल्याचा दावा केला होता. त्यानंतर रशियाची लस सुरक्षित नसल्याचा संशय अनेक देशांनी व्यक्त केला होता.

मॉस्को - कोरोनावर लशीसाठी जगभरातील अनेक देश संशोधन करत असताना सर्वात आधी रशियाने लस तयार केल्याचा दावा केला होता. त्यानंतर रशियाची लस सुरक्षित नसल्याचा संशय अनेक देशांनी व्यक्त केला होता. अखेर रशियाची स्पुटनिक 5 ही लस अँटीबॉडी तयार करण्यासाठी प्रभावी ठरत असून कोरोना विरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचं समोर आलं आहे असा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे.

अॅलेक्झांडर गिन्टसबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांना कोरोनाची ही लस देण्यात आली त्या प्रत्येकामध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या आहे. विशेष म्हणजे यापैकी एकावरही दुष्परिणाम झाले नाहीत अंसही त्यांनी सांगितलं. 

लँसेटने पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार स्पुटनिक 5 लस दिलेल्या 76 जणांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्या असून चाचणी यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. सध्या ज्यांना व्हॅक्सिनचा डोस देण्यात आला आहे त्यांच्यात तयार झालेल्या अँटीबॉडीज कोरोनाशी लढण्यास सक्षम असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. 

हे वाचा - माणसांसाठी लस कधी? माकडानंतर उंदरावरही लशीचा यशस्वी प्रयोग

मॉस्कोचे महापौर सर्जी सोबिनिन यांनीही नोंदणीपश्चात स्पुटनिक 5 ची क्लिनिकल ट्रायल दोन ते सहा महिन्यांपर्यंत चालू शकते. याचे व्यापक प्रमाणावर लसीकरण 2020 च्या शेवटी किंवा 2021 च्या सुरुवातीला होईल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

रशियाने गेल्याच महिन्यात जगातील पहिली कोरोना लस तयार केल्याची घोषणा केली होती. गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने याची क्लिनिकल ट्रायल जून आणि जुलै महिन्यात घेतली होती. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या लशीमुळे पुढची दोन वर्षे प्रतिकार शक्ती चांगली राहते असा दावाही करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: russia sputnic 5 covid vaccine developing antibodies no side effects