युक्रेनला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!

अमेरिकेकडून पुरवठा; रशियावर हल्ला न करण्याची ग्वाही
russia ukraine war crisis Sophisticated missiles to Ukraine Supply from USA not to attack Russia
russia ukraine war crisis Sophisticated missiles to Ukraine Supply from USA not to attack Russia

वॉशिंग्टन : युक्रेनच्या पूर्वेकडील भागात रशियाच्या फौजांकडून हल्ले सुरूच आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धात युक्रेनला अमेरिकेकडून उच्च तंत्रज्ञानयुक्त मध्यम पल्ल्याचा क्षेपणास्त्र प्रणाली मिळणार आहे. डोनबास प्रदेशात रशियाची आगेकूच रोखण्यासाठी हे शस्त्र मिळावे, अशा मागणी युक्रेन अनेक दिवसांपासून करीत होता.नव्या क्षेपणास्त्रांच्‍या मदतीने शत्रू देशाच्या लक्ष्यावर दूरवरून अधिक अचूकतेने हल्ला करणे शक्य होणार आहे. रशियाच्या फौजांचा सामना करण्यासाठी आणि त्यांना रोखण्‍यासाठी युक्रेनला सुरक्षा यंत्रणा पुरविण्यासाठी अमेरिकेने नव्याने ७० कोटी डॉलरचा करार केला आहे.

यात हेलिकॉप्टर, जॅवेलिन रणगाडा विरोधी शस्त्र प्रणाली, लढाऊ वाहने, सुटे भाग आणि अन्य मदत युक्रेनला पुरविण्यात येणार आहे. नवी क्षेपणास्त्र प्रणाली याच कराराचा भाग आहे, असे अमेरिकी प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३१) सांगितले. या शस्त्रांचे अधिकृत अनावरण आज करण्यात आले.हे शस्‍त्र अमेरिकेने द्यावे, अशी मागणी युक्रेनकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. पण त्याच्या सह्याने युक्रेन रशियातील काही भागांवर हल्ले करेल, या भीतीने ती अमेरिकेने अमान्य केली होती. पण आता युक्रेनला क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याची घोषणा करतानाच अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले, की यामुळे रशियाविरोधात युक्रेनची बाजू भक्कम होईल आणि राजनैतिक पातळीवर युक्रेनला मदत केल्याचे समाधानही मिळेल. या क्षेपणास्त्रांचा उपयोग रशियाच्या भूमीवर करणार नसल्याची ग्वाही युक्रेनने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • युक्रेनला आधुनिक विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि रडार प्रणाली देण्याची जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी आज जाहीर केले.

  • रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय समुदायाच्या समान संरक्षण धोरणात सहभाग घेण्याबाबत डेन्मार्कमध्ये आज मतदान झाले. यात ४० टक्के मतदारांनी बाजूने आणि ३० टक्के नागरिकांनी विरोधात मतदान केले.

  • रूबलमध्ये शुल्क देण्यास नकार दिल्याने रशियाने गॅस पुरवठा थांबविल्याचे ‘ऑरस्टेड’ या डेन्मार्कमधील सर्वांत मोठ्या ऊर्जा कंपनीने सांगितले.

सत्तर किलोमीटरचा पल्ला : व्‍हाइट हाउसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की युक्रेनला देण्यात येणाऱ्या नव्या शस्त्रास्त्रांमध्‍ये एम १४२ हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम (एचआयएमएआरएस) चाही समावेश आहे. किती क्षेपणास्त्र देणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. ७० किलोमीटर दूरवरील लक्ष्य या क्षेपणास्त्राद्वारे भेदणे शक्य होणार आहे. रशियाच्या शस्त्रांच्या तुलनेत हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यभेद करते, असा दावा केला जात आहे. डोनबास भागात शिरलेल्या रशियाच्या तोफखान्याचा सामना करणे आणि सिव्हरोडोनेत्स्कसारख्या शहरात रशियाच्या ठाण्यांवर हल्ला करणे नव्या शस्त्रांद्वारे युक्रेनला शक्य होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com