
Russia Ukraine Crisis : युक्रेनचा थेट मॉस्कोवर हल्ला; ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा रशियाचा दावा
किव्ह : युक्रेनने आज पहाटेच थेट मॉस्कोवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने आज केला. युक्रेनने पाठविलेले आठही ड्रोन हवेतच रोखल्याने मोठी हानी टळली, असा दावाही यावेळी करण्यात आला. दुसरीकडे, रशियाने आजही युक्रेनची राजधानी किव्हवर हवाई हल्ले केले. २४ तासांत तिसऱ्यांदा झालेल्या या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, युक्रेनने आज पहाटे आठ ड्रोनच्या मदतीने मॉस्कोवर हल्ला केला. या आठ ड्रोनपैकी पाच ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले, तर उरलेल्या तीन ड्रोनची यंत्रणा जॅम केल्याने हा हल्ला फसला. मात्र, हा दहशतवादी हल्ल्याचाच प्रकार असल्याचा दावा रशियाने केला.
युक्रेनने केलेल्या या हल्ल्यात काही इमारतींचे नुकसान झाले तर दोन जण जखमीही झाल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनने रशियाच्या या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, हा हल्ला खरोखरीच झाला असल्यास तो युक्रेनने रशियावर केलेला सर्वांत धाडसी हल्ला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या हल्ल्यामुळे रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण केली जात आहे.
दरम्यान, किव्हवर रशियाने आज सलग पाचव्या दिवशी हल्ले केले. रशियाने वीस ड्रोनच्या साह्याने हल्ले केले. यात अनेक इमारतींचे नुकसान होऊन एका व्यक्तीचा मृत्युही झाला. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे अनेक ड्रोन पाडण्यात आले. मागील चोवीस तासांमध्ये किव्हवर तिसऱ्यांदा हल्ला झाला. या तीन हल्ल्यांमध्ये रशियाने एकूण ३१ ड्रोनचा वापर केला होता. त्यापैकी २९ ड्रोन युक्रेनने पाडले.