मारिउपोलमध्ये तीव्र हल्ल्यांचा इशारा...

शरणागतीसाठी दिलेली कालमर्यादा उलटली; सैनिकांकडून मदतीचे आवाहन
Russia Ukraine war update Warning of severe attacks in Mariupol Volodymyr Zelenskyy Vladimir Putin
Russia Ukraine war update Warning of severe attacks in Mariupol Volodymyr Zelenskyy Vladimir Putinsakal

किव्ह : मारिउपोलमधील युक्रेनच्या सैनिकांना आणि जनतेला शस्त्रे खाली टाकून शरणागती पत्करण्यासाठी रशियाने दिलेली कालमर्यादा उलटून गेली आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही, असे युक्रेनच्या सैनिकांनी स्पष्ट केले असले तरी त्यांनी मित्रदेशांना मदतीचे आवाहनही केले आहे. युक्रेनच्या पूर्व भागावर ताबा मिळविण्यासाठी रशियाने सुरु केलेल्या संघर्षात मारिउपोल शहरावर नियंत्रण मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, फेब्रुवारीत रशियाने आक्रमणाला सुरुवात करून काही दिवसांतच मारीउपोलला वेढा घातल्यानंतरही आज युद्धाचा ५६ वा दिवस उजाडला तरी त्यांना या शहरावर पूर्ण ताबा मिळविता आलेला नाही.

शहराचा मोठा भूभाग त्यांच्या ताब्यात आला असला तरी येथील पोलाद प्रकल्पातील भुयारांमध्ये लपून बसलेले युक्रेनचे सैनिक माघार घेण्यास तयार नाहीत. त्यांना शरणागती पत्करण्यासाठी रशियाने जाहीर केलेली दुसरी कालमर्यादाही आज संपली. त्यामुळे रशियाकडून येथे तीव्र हल्ले होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मारिउपोलमध्ये लढा देत असलेल्या युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने आमचे अखेरचे काही तास शिल्लक असल्याची शक्यता वर्तविली आहे. आम्ही शरण जाणार नाही, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत मिळावी, अशी आमची विनंती आहे, असे या अधिकाऱ्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. मारिउपोलमध्ये रशियाने आज जोरदार तोफगोळ्यांचा मारा करताना रुग्णालयांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात अनेक इमारती कोसळल्या.

युद्धामुळे लाखो बेघर; अर्धा कोटी लोकांनी युक्रेन सोडले

बर्लिन: रशियाने २८ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आतापर्यंत सुमारे ५० लाख नागरिकांनी अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे. फेब्रुवारीत ६ लाख ४५ हजार तर मार्च महिन्यांत ३४ लाख नागरिकांनी देश सोडला आहे. या महिन्यांत आतापर्यंत ९ लाख ४५ हजार नागरिकांनी परदेशात आश्रय घेतला आहे. संयुक्त राष्ट्राने या स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली असून परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाने म्हटले की, बुधवारपर्यंत युक्रेनमधील ५१ लाख नागरिक निर्वासित झाले आहेत.२४ फेब्रुवारी रोजी रशियाने हल्ला केल्यानंतर आतापर्यंत ४,९८०,५८९ नागरिकांनी युक्रेन सोडले. सोमवारी एका दिवसांत ४६ हजार १७४ लोकांनी आपला देश सोडला. निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संघटनेने (आयओएम) ने म्हटले की, युक्रेनमध्ये शिक्षणानिमित्त आणि कामानिमित्त राहणारे सुमारे २ लाख १५ हजार नागरिक देखील शेजारी देशात किंवा मायदेशी परतले आहेत. याचाच अर्थ युद्ध सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ५२ लाख लोकांनी युक्रेन सोडला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात निर्वासितांची संख्या सर्वाधिक असल्याचे आयओएमच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. यूएनएचसीआरच्या प्रवक्त्या शाबिया मंटू यांनी जिनेव्हात सांगितले की, युक्रेनच्या सीमा खुल्या राहणे आवश्‍यक असून जेणेकरून नागरिक सुरक्षितपणे देश सोडू शकतील आणि शेजारी देशातही त्यांना वेळेवर मदत मिळू शकेल. पुढे काय होईल, यावरून आम्हाला चिंता आहे. अत्यंत कमी काळात निर्वासितांची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक होणे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. युक्रेनमधील एकूण मुले आणि महिलांपैकी ९० टक्के जणांवर देश सोडण्याची वेळ आली आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • रशियाचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा जपानकडून रद्द

  • रशियाकडून एका दिवसात ७३ हवाई हल्ले

  • कॅनडा युक्रेनला रणगाडे पुरविणार

  • रशियाची २५ टक्के युद्धक्षमता संपुष्टात आल्याचा अमेरिकेचा दावा

  • ‘ऑर्थोडॉक्स ईस्टर’ सणानिमित्त चार दिवस युद्धविराम घेण्याचे अमेरिकेचे आवाहन

  • रशियाकडून नेदरलँडच्या १५ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

  • अमेरिकेने शस्त्र पुरविल्यामुळेच युद्ध : रशिया

युक्रेनचे तुकडे करण्याचा डाव

रशियाने युक्रेनच्या पूर्व भागात सैन्य तैनात केले असून हा औद्योगिक भाग युक्रेनपासून तोडण्याचा त्यांचा डाव असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. युक्रेनच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कारखाने आणि कोळसा खाणी आहेत. दोन्बास म्हणून ओळखला जाणारा हा पूर्व भाग ताब्यात आल्यास रशियासाठी तो मोठाच विजय असेल. या भागातील मारिउपोल, खारकिव्ह आणि क्रामातोर्स्क ही मोठी शहरे ताब्यात आली नसली तरी ही शहरे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

वीस दिवसांत नऊ लाख लोकांनी युक्रेन सोडले

१ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत सुमारे ९ लाख ४५ हजार नागरिकांनी युक्रेनमधून आपले बस्तान हलवले आहे. तसेच २८ लाखांपेक्षा अधिक निर्वासित पोलंडला गेले असून रुमानियातही अनेकांनी आश्रय घेतला आहे. यूएनएचसीआरच्या मते, फेब्रुवारीत साडे सहा लाख नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. एवढेच नाही तर युक्रेनमध्येच ७० लाख लोकांना जागा सोडण्याची वेळ आली आहे.

केवळ लष्करी ठिकाणांवर हल्ले करत असल्याचा दावा करणारे रशियन सैन्य अनेक सामान्य नागरिकांची हत्या करत आहे. जगातील सर्वांत रानटी आणि क्रूर सैन्य म्हणून रशियन सैन्य स्वत:चे नाव इतिहासात कोरून ठेवत आहे.

- व्होलोदीमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com