esakal | पुतिन विरूद्ध नवाल्नी
sakal

बोलून बातमी शोधा

vladimir putin and nawalny.

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या कारकीर्दीत होणाऱ्या राजकीय विरोधकांचा वेगवेगळ्या पद्धतीने काटा काढला आहे.

पुतिन विरूद्ध नवाल्नी

sakal_logo
By
विजय नाईक

नवी दिल्ली- रशियाचे माजी अध्यक्ष मिखैल गोर्बाचेव यांची 1991-91 मधील लोकशाहीला चालना देणारी कारकीर्द सोडली, तर जनतेसाठी तेथील राजकारण, नोकरशाहीची साम्यवादी जाचक प्रणाली बदलेली नाही. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या कारकीर्दीत होणाऱ्या राजकीय विरोधकांचा वेगवेगळ्या पद्धतीने काटा काढला आहे. राजकीय विरोधक व भ्रष्टाचाराविरूद्ध लढा देणारे अलेक्सी नवाल्नी यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाची सूत्रे पुतिन यांनी हलविली, असा आरोप खुद्द नवाल्नी यांनी केला आहे. तथापि, मी तो नव्हेच, असा पवित्रा पुतिन यांनी घेतला. विषप्रयोगानंतर जागतिक दबावामुळे नवाल्नी यांना जर्मनीतील हॉटेलमध्ये हलविण्यात आले होते. ते बरे होऊन मॉस्कोत परततात न परततात तोच त्यांना महिन्याभरासाठी अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या हजारो समर्थकांनी रविवारी रशियातील निरनिराळ्या शहरातून निदर्शने केली. गेली दोन आठवडे निदर्शने चालू आहेत. मॉस्कोतील निदर्शनादरम्यान त्यांच्या तब्बल पावणेपाच हजार समर्थकांना अटक करण्यात आली. नवाल्नी यांना ज्या तुरूंगात ठेवण्यात आले आहे, त्याला घेराव करण्याचा प्रयत्न समर्थक करीत होते. निदर्शकात त्यांची पत्नी युलिया नाव्हल्नाया यांचाही समावेश आहे.

कोरोनामुळे आर्थिक परवड; झोपडपट्टीवासियांनी सुरु केली स्वत:चीच बँक

हे ही नसे थोडके म्हणून, 2014 मध्ये देण्यात आलेली साडे तीन वर्षांची कैदेची शिक्षा त्यांनी पूर्णपणे न भोगल्याने (कारण ते औषधोपचारासाठी जर्मनीतील रूग्णालयात गेले) त्यांना 2 फेब्रुवारी 2021 रोजी तीच शिक्षा पुन्हा ठोठाण्यात आली. पुतिन यांनीच विषप्रयोग केल्याचा आरोप नवाल्नी यांनी केला. ते म्हणाले, पुतिन यांना जागतिक नेता व ऐतिहासिक पुरूष म्हणून पुढे यायचे आहे. पण, विरोधकांवर विषप्रयोग करणारे नेते म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल.    

पोलोनियम -210 याचा विषप्रयोगात रशियन गुप्तचर खात्यातर्फे (एफएसबी- फेडरल सिक्युरीटी सर्व्हीस, पूर्वीच्या केजिबाचा नवा अवतार) वापर होतो, हे सिद्ध झाले आहे. या पूर्वी 44 वर्षीय रशियन हेर अलेक्झांडर लिटव्हिनेन्को याच्यावर दोन रशियन गुप्तचरांनी लंडनमध्ये विषप्रयोग केला. त्यात त्याचा 23 नोव्हेंबर 2006 रोजी मृत्यू झाला. माफिया स्टेट, असे रशियाचे वर्णन त्याने केले होते. लिटव्हिनेन्को व त्याच्या सहकाऱ्यांवर रशियन उद्योगपती बॉरिस बेरेझोव्हस्की यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, प्रसिद्ध रशियन पत्रकार अना पॉलिटोकोव्स्काया हिचा खून करण्याचे आदेश ऑक्टोबर 2006 मध्ये पुतिन यांनी दिले होते, असा लिटव्हिनेन्को यांचा आरोप होता. रशियन गुप्तचर संघटना लंडनस्थित लिटव्हिनेन्को यांच्या हालाचालींवर नजर ठेऊन होती. त्यानंतर एका महिन्यातच 1 नोव्हेंबर रोजी लिटव्हिनेन्को एकाएकी आजारी पडले. 22 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लिटव्हिनेन्को यांना सांगितले होते, की त्यांना पोलोनियम -210 हे विष पाच पटीने अधिक देण्यात आले होते.

20 ऑगस्ट 2020 रोजी नवाल्नी यांना गुप्तचरांनी पेयातून नोव्हिचोक विष दिले. टोम्स ते मॉस्को या विमानप्रवासात ते एकाएकी गंभीर आजारी पडले. विमानाचे उड्डाण मधेच थांबवून त्यांना त्वरित टोम्स येथील रूग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. ते बेशुद्धावस्थेत राहावे, असे औषधोपचार करण्यात आले. त्याबाबत जगातून चिंता व्यक्त करण्यात आल्यामुळे त्यांना पुढील औषधोपचारासाठी बर्लिनमधील चार्ली रुग्णालयात हलविण्यात आले. त्या नंतर दोन दिवसातच झालेल्या चाचण्यात रासायनिक शश्त्रास्त्र प्रतिबंधक संघटनेच्या प्रयोगशाळेने त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे जाहीर केले. 22 सप्टेंबर 2020 रूग्णालयातून त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यात त्यांचे रक्त व मूत्र यात नोव्हिचोक विष आढळले. बर्लिनमधील रुग्णालयात त्यांच्यावर तब्बल पाच महिने औषधोपचार चालू होते. नाव्हल्नी म्हणतात, की विषवप्रयोगातूनही मी बचावलो म्हणून पुतिन यांचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे मला संपविण्यासाठी ते काहीही करतील. दरम्यान, जागतिक मत नवाल्नींच्या बाजूने गेले आहे. त्यांच्या नावाची नोबेल पारितोषकासाठी शिफारस करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी कायपण! अमेरिकेतील NBA स्टार खेळाडूने केली आर्थिक मदत

युरोपीय महासंघ व ब्रिटनने गुप्तचर एफएसबी संस्थेचे संचालक अलेक्झांडर बोर्तनिकोव व रशियाच्या स्टेट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑरगॅर्निक केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पाच ज्येष्ठ अधिकाऱ्यांवर निर्बंध घातल्याचे जाहीर केले. चीन व रशियामध्ये विरोधकांवर गुप्तचर संघटनांची सातत्याने नजर असते. त्यांचा विरोध वाढतोय, असे दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकार मागे पुढे पाहात नाही. फरक एवढाच की रशियातील कारवाया अध्यक्ष पुतिन यांच्या आदेशानुसार होतात, तर चीनमध्ये त्या अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील सामुहिक नेतृत्वातर्फे केल्या जातात. 

पुतिन यांनी गुप्तपणे 17,691 चौरस मीटर जागेवर काळ्या समुद्रानजिक एक आलिशान खाजगी महाल बांधल्याचा आरोप नुकताच नवाल्नी यांनी केला. त्याचे पुतिन यांनी खंडन केले. दोन तासांच्या व्हिडिओद्वारे या महालाची चित्रे साऱ्या जगाला दिसली. महालावर 1 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले, असा नवाल्नी यांच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेचा दावा आहे.   

स्टालिनच्या काळात विरोधकांना गुलाग अर्चिपॅलॅगो या सैबेरियाचतील छळ छावण्यात पाठविण्यात येत असे. त्याचे थरारक वर्णन नोबेल पारितोषिक विजेते स्टालिनचे विरोधक व प्रसिद्ध लेखक अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांनी अऩेक पुस्तकातून केले आहे. 

1979 मध्ये मी रशियात (पूर्वाश्रमीचा सोव्हिएत युनियन) दीड महिना राहिलो होतो. त्यावेळी रशियात ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांची तयारी चालू होती. लिओनिड ब्रेझनेव्ह अध्यक्ष व कम्युनिस्ट पक्षाचे महाचिटणीस होते. ऑलिम्पिकच्या निमित्ताने मॉस्कोत परदेशी पत्रकार येतील म्हणून विरोधक व प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ अलेक्झांडर साखारोव व त्यांची पत्नी साखारोवा यांना त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आले होते. घऱाभोवती सशस्त्र पोलिसांचा पहारा होता. त्यावरून मी रोज येत जात असे. परदेशी पत्रकारांना त्यांना भेटण्याची सक्त मनाई होती. 2012 मध्ये पुतिन यांच्याविरूद्ध चर्चमध्ये निदर्शने करणाऱ्या पुसि रायाट या महिला बँडच्या तीन गायिंकाना अटक करण्यात आली व त्यांना दोन वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

पाकिस्तानला दणका; इराणने सर्जिकल स्ट्राइक करुन सोडवले सैनिक

उद्योगपती मिखेल खोरदोकोव्हस्की या लोकप्रिय नेत्याचाही पुतिन सरकारतर्फे छळ करण्यात आला. रशियातील ते सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. परंतु, पुतिन यांना विरोध करताच त्यांच्याविरूद्ध कारवायांना सुरूवात झाली. त्यांनी रशियात होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनांविरूद्ध आवाज उठविला होता. सरकारने त्यांची देशातील व देशाबाहेरील सारी संपत्ती जप्त केली. त्यांना अटक केली. तुरूंगात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. रशियातून हद्दपार करण्यात आले. ते आता लंडनमध्ये राहात आहेत. 

नवाल्नी यांना व त्यांच्या समर्थकांना धडा शिकविण्याचा विडा पुतिन यांनी उचलला आहे. त्यांच्या हाती सत्ता आहे. त्यामुळे, नवाल्नी यांचा लढा धोक्याच्या वळणावर येऊन ठेपला आहे. रशियासारख्या एकाधिकारशाहीत सत्तेविरूद्ध लढा देणाऱ्या नवाल्नी यांच्या धैर्याची प्रशंसा, करावी तेवढी थोडी.