पुन्हा सीरियावर हल्ले केले, तर.. : रशिया 

वृत्तसंस्था
सोमवार, 16 एप्रिल 2018

मॉस्को : 'पाश्‍चिमात्य देशांनी सीरियावर पुन्हा हल्ले केले, तर जागतिक समीकरणे पूर्णत: बदलून जातील', असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल (रविवार) दिला. रासायनिक शस्त्रांच्या वापराच्या आरोपावरून अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने गेल्या आठवड्यात सीरियावर हवाई हल्ले केले होते. रशिया आणि इराण या दोन देशांचा या कारवाईला विरोध आहे. 

यासंदर्भात रशियाने अधिकृत पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली. 'अशा कारवाईमुळे संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचे उल्लंघन होत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोंधळाचेच वातावरण निर्माण होणार आहे', असे पुतीन यांनी यात नमूद केले आहे. दुसरीकडे, या कारवाईला विरोध करणाऱ्या रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. 

इराणचे अध्यक्ष हसन रुहानी आणि पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून या विषयावर चर्चा झाली. 'अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे सीरियाच्या प्रश्‍नावर राजकीय तोडगा निघण्याच्या शक्‍यतांना मोठा धक्का बसला आहे', असे दोन्ही नेत्यांचे म्हणणे आहे. 

अमेरिकेच्या दाव्यानुसार, रासायनिक शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या सीरियातील तीन कारखान्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. यात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी मिळून एकूण 105 क्षेपणास्त्रे डागली. सीरियाचे वादग्रस्त नेते बशर अल असाद आणि त्यांच्या मित्र देशांविरोधातील ही अलीकडची सर्वांत मोठी कारवाई आहे.

दौमा येथे 7 एप्रिल रोजी रासायनिक हल्ला झाला होता आणि त्यात अनेक नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यास अमेरिकेने असाद यांच्या राजवटीसच जबाबदार धरले आहे. 

Web Title: Russia warns US against strikes in Syria