Russia Ukraine Crisis: रशियाकडून युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ले; चार नागरिकांचा मृत्यू, अनेक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine Crisis

Russia Ukraine Crisis: रशियाकडून युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ले; चार नागरिकांचा मृत्यू, अनेक जखमी

युक्रेनची राजधानी किव्ह आणि इतर शहरांवर रशियाने रविवारी रात्री इराणनिर्मित ड्रोनच्या साह्याने हल्ला केला. रशियाने केलेल्या या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे ३५ ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला.

रशियाने युक्रेनच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागातील १२७ ठिकाणी हल्ले केल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. रशिया मागील काही महिन्यांपासून हल्ल्यांसाठी इराणनिर्मित शाहिद ड्रोनचा वापर करत आहे.

रशियाने ड्रोनबरोबरच तोफगोळे, लढाऊ विमाने, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे यांच्या साह्यानेही मारा केला. या हल्ल्यांमध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यांदरम्यान युक्रेननेही एकूण ३५ ड्रोन हवेतच नष्ट केले.

व्हिक्टरी डे संचलन रद्द

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा रशियाने केलेल्या पराभवाची आठवण म्हणून रशियामध्ये उद्या (ता. ९) ‘व्हिक्टरी डे’ संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, युक्रेननेही प्रतिहल्ले सुरु केले असून आणि काही दिवसांपूर्वीच मॉस्कोमध्येही ड्रोन हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर रशियातील २१ शहरांनी ‘व्हिक्टरी डे’ संचलन रद्द केले आहे. राजधानी मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होणार आहे, मात्र यावेळीही ड्रोनच्या वापराला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Russia Ukraine Crisis