पाकच्या "मदर तेरेसा' डॉ. रुथ फाऊ यांचे निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी 1962 मध्ये कराचीमध्ये मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर स्थापन केले आणि नंतरच्या काळात या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत

 कराची - पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्‍टर रुथ फाऊ (वय 85) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

डॉ. फाऊ या 1960 मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या हेलावून गेल्या आणि त्यांनी कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. नन असलेल्या डॉ. फाऊ यांनी 1962 मध्ये कराचीमध्ये मारी ऍडलेड लेप्रसी सेंटर स्थापन केले आणि नंतरच्या काळात या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांवर उपचार केले आहेत. डॉ. फाऊ यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुष्ठरोगापासून मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने 1996 मध्ये जाहीर केले.

डॉ. फाऊ यांनी सोसायटी ऑफ डॉटर्स ऑफ हार्ट ऑफ मेरी या संस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांना भारतात काम करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, व्हिसासंबंधी अडचण आल्याने त्या काही काळासाठी मध्येच कराचीत उतरल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांशी बोलताना त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्या कायमस्वरूपी येथेच थांबल्या. त्यांना पाकिस्तानचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला हिलाल ए इम्तियाज 1979 मध्ये आणि हिलाल ए पाकिस्तान हा पुरस्कार 1989 मध्ये प्राप्त झाला होता. त्यांना 2015 मध्ये स्टॉफलर मेडलही प्रदान करण्यात आले होते.

Web Title: Ruth Pfau: Pakistan's 'Mother Teresa' dies aged 87