मुस्लिम असल्यानेच सलमान खानला शिक्षा : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री

Sakal | Friday, 6 April 2018

''सलमान खान अल्पसंख्याक समुदायातील असल्यानेच त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.'' - ख्वाजा आसिफ, परराष्ट्रमंत्री, पाकिस्तान

इस्लामाबाद : सीमावर्ती भागामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानने आता सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरदेखील चिखलफेक करायला सुरवात केली आहे. सलमान खान अल्पसंख्याक समुदायातील असल्यानेच त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. 

काळविटाची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने काल (गुरुवार) दोषी ठरवले. तसेच न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. याशिवाय दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर त्याची जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या या शिक्षेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी न्यायव्यवस्थेवर टीका केली. ते म्हणाले, सलमान खान अल्पसंख्यांक समुदायातील असल्यानेच त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सलमान खानचे सत्ताधारी पक्षासोबत संबंध असते तर त्याला कमी शिक्षा झाली असती, असे अजब तर्कत्यांनी त्यांनी मांडले. 

पाकिस्तानतील स्थानिक वृत्तवाहिनी 'जिओ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना आसिफ यांनी हे वक्तव्य केले. तत्पूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनेही काश्‍मीरमधील चकमकींबाबत वादग्रस्त ट्विट करत वाद ओढवून घेतला होता.