कोरोनामुळे दुरावलेल्यां वृद्धांसाठी मायेचा स्पर्श; भावूक करणारा फोटो

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवणंही बंधनकारक आहे.

सॅन साल्वाडोर - कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवणंही बंधनकारक आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यापासून नातेवाईकांपासून दूर असलेल्या वृद्ध लोकांसाठी सॅन साल्वाडोरमध्ये विशेष भेटीचं आयोजन करण्यात आलं. यासाठी एका प्लास्टिकच्या पडद्याच्या सहाय्याने सुरक्षित अशा गळाभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वृद्धांना त्यांच्या नातेवाईकांची जवळून भेट घेता आली. जेरियाट्रिशियन लुइस बर्मेडेझ यांनी 'एएफपी'ला दिलेल्या माहितीनुसार वृद्धांमध्ये चिंता आणि नैराश्याचं प्रमाण असतं ते कमी करण्यासाठी मिठी मारणं फायद्याचं ठरू शकतं. 

साल्वाडोरमधील या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सॅन साल्वाडोरच्या पश्चिम भागात असलेल्या जॉर्डन दे लॉस अबुलिटोस इथं या भेटीचे आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी दोन आठवड्याच्या शिफ्टमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची एक टीम वृद्धांची काळजी घेते. यात ज्या लोकांना आजार आहेत, प्रतिकार शक्ती कमी आहे अशा वृद्धांसाठी खास प्लास्टिक पडदा तयार करण्यात आला.

प्लास्टिकच्या पडद्याचा वापर करून वृद्धांची त्यांच्या नातेवाईकांशी गळाभेट करून दिली. कोरोनाच्या साथीने कुटुंबातील लोक आणि नातेवाईकांसोबतच्या नेहमीच्या संपर्कामध्ये बराच बदल झाला. शारिरीक संपर्क जवळपास बंदच झाला होता. यामुळे  वृद्धांमध्ये चिडचिड, नैराश्य, चिंता वाढली होती. आता अलिंगनामुळे त्यांच्यातील निराशा कमी होईल असं बर्मेडेझ यांनी म्हटलं. 

वृद्धांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता यावं यासाठी खास योजनाही तयार केली आहे. यासाठी प्रोटोकॉल तयार करण्यात आला. व्हायरल होत असेलला फोटो हा मारिया ग्रेगोरिया रामोस हिचा असून ती वृद्ध नातेवाईक सेसिलियाची भेट घेत असल्याचं दिसतं. योजनेनुसार वृद्धांना दिवसातून दोन वेळा भेट घेता येते. त्यासाठी जास्तीजास्त अर्धा तास वेळ दिला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: san salvador plastic urtain for meet and hug relatives during covid pandemic