कोरोनाच्या प्रसाराचे कारण अमेरिकेने घेतलं मागे; सीडीसीवर दुसऱ्यांदा ओढावली वेळ

सकाळ वृत्तसंस्था
Wednesday, 23 September 2020

या संकेतस्थळावर शुक्रवारी (ता. १८) कोरोना प्रामुख्याने हवेतून पसरतो, असे लिहिले होते. पण हे कारण लगेचच दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूंचा फैलाव हवेत उडणाऱ्या कणांमधून होतो, असे अमेरिकेच्या रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण संस्थे (सीडीसी)ने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले होते. पण आता संस्थेने हे कारण मागे घेतले आहे.‘सीडीसी’च्या संकेतस्थळावर ही चुकीची माहिती पोस्ट झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. अशा प्रकारे माहिती मागे घेण्याची ‘सीडीसी’ची ही दुसरी वेळ आहे.

या संकेतस्थळावर शुक्रवारी (ता. १८) कोरोना प्रामुख्याने हवेतून पसरतो, असे लिहिले होते. पण हे कारण लगेचच दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. संकेतस्थळावर सोमवारी (ता.२१) श्‍वासाच्या कणांतून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे नमूद केले आहे. मात्र याविषयी अद्याप संशोधन सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे. ‘सीडीसी’च्या संदिग्ध भूमिकेमुळे शास्त्रज्ञांमध्ये खळबळ उडाली असून संस्थेच्‍या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या आकस्मिक बदला मागे राजकीय हस्तक्षेपाऐवजी संस्थेच्या शास्त्रीय मूल्यांकन प्रक्रियेत काही तरी गडबड झाल्‍याचे दिसते, असे मत या विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. संस्था लवकरच नवी नियमावली प्रसिद्ध करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'चीनने कोरोना लपवण्याचा प्रयत्न केला, WHO सुद्धा या कटात सहभागी'

तज्ज्ञ म्हणतात...
- सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणतीही माहिती काटेकोरपणे तपासल्याशिवाय पोस्ट कशी केली?
- हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्रार करण यांच्या म्हणण्यानुसार विज्ञानाशी संबंधित या चर्चेत संस्था मोठे दावे करीत असल्याचे लक्षात आले होते.
- या सर्व प्रक्रियेची चौकशी सुरू असून सर्व नियमावली व ताजी माहिती देण्यापूर्वी त्याची शहानिशा अधिक कडकपणे केली जाईल, असे ‘सीडीसी’चे प्रवक्ते जेसन मॅकडोनाल्ड यांनी स्पष्ट केले.

शास्त्रीय संशोधनानुसार...
-काही विशिष्ट ठिकाणी सूक्ष्मतुषारांचा प्रभाव असतो.
- जेथे खेळती हवा कमी असते अशा मुख्यत्वे बार, व्यायामशाळा, क्लब आणि उपहारगृहांसारख्या बंदिस्त जागांमध्ये सूक्ष्मतुषारांचा फैलाव जास्त असतो.
- अशा ठिकाणी विषाणू हवेत जास्त काळ राहू शकतात आणि सहा फुटांपेक्षा जास्त अंतरापर्यंत ते पसरू शकतात, अशी माहिती ‘सीडीसी’ने शुक्रवारी (ता.१८) पोस्ट केली होती.

हेही वाचा - इराणवर अमेरिकेचे एकतर्फी निर्बंध; अनेक संस्था आणि व्यक्तींची संपत्ती गोठवली

‘सीडीसी’च्या विश्‍वासार्हतेवर सवाल
- कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्यापासून संस्थेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत.

- एप्रिलमध्ये सुरुवातीला मास्क लावणे आवश्‍यक नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते. पण नंतर चेहरा झाकण्याचा सल्ला दिला होता.
- जे लोक संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आले असून त्यांच्यात लक्षणे दिसत नसली तर त्यांना चाचणी करण्याची गरज नाही, असे ऑगस्टमध्ये म्हटले होते.
- हा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला नसून अधिकाऱ्यांकडून दिला होता, हे गेल्या आठवड्यात उघडकीस आले.
- संस्थेने यात बदल करीत संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याची सूचना दिली.
- ‘सीडीसी’चे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांचे ‘कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नाही,’ हे विधान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोटे असल्याचे नंतर सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second time CDC retracts info on how Covid 19 spreads