esakal | तालिबान्यांची दहशत; भारताचे अफगाणिस्तानातील दूतावास बंद?
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे वर्चस्व वाढत असल्याच्या आणि त्यामुळे सुरक्षा स्थिती ढासळत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कंदाहारमधील आपल्या वकीलातीमधील ५० राजनैतिक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना मायदेशी परत आणले आहे

तालिबान्यांची दहशत; भारताचे अफगाणिस्तानातील दूतावास बंद?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे वर्चस्व वाढत असल्याच्या आणि त्यामुळे सुरक्षा स्थिती ढासळत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कंदाहारमधील आपल्या वकीलातीमधील ५० राजनैतिक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना मायदेशी परत आणले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेली ही कृती असून वकीलात बंद करण्याचा भारताचा विचार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले आहे. (security personnel evacuated but Kandahar consulate not shut India external affairs ministry)

कंदाहारमधील भारताचे राजनैतिक अधिकारी, वकीलातीमधील कर्मचारी आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान यांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने विशेष विमान (ता. १०) कंदाहारला पाठविले होते. कंदाहारजवळील गावांमध्ये अफगाणिस्तानचे सैनिक आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये तुंबळ लढार्इ सुरु असल्याने वकीलातीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या काळासाठी हलविले असल्याचे बागची यांनी सांगितले. तसेच, वकीलात बंद केली नसून स्थानिक कर्मचाऱ्यांच्या साह्याने तिचे कामकाज सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना बागची म्हणाले की,‘‘अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भारताचे लक्ष आहे. या देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असल्याने त्यांना काही काळासाठी भारतात आणले आहे. वकीलातीचे कामकाज सुरुच राहणार असून व्हीसा मंजूर करण्यासह इतर महत्त्वाची कामे काबूल येथील भारतीय दूतावासामार्फत केली जाणार आहेत.’’ कंदाहार आणि मझार ए शरीफ येथील वकीलात बंद करण्याचा भारताचा विचार नसल्याचेही बागची यांनी सांगितले.

हेही वाचा: अवकाश पर्यटनाची दारे खुली; भारतीय वंशाच्या शिरिशाचे यशस्वी भ्रमण

अमेरिकेची सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरु असतानाच तालिबानी दहशतवाद्यांचे वर्चस्व वाढत असून त्यांनी अनेक जिल्ह्यांवर ताबा मिळविला आहे. संघर्ष वाढल्याने दोन देशांनी मझार ए शरीफ येथील आपल्या वकीलाती बंद केल्या आहेत. अफगाणिस्तानच्या राजदूतांनी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांना परिस्थितीची माहिती दिली. यानंतर भारताने कंदाहारमधील भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माघारी आणण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात चीननेही त्यांच्या २१० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मायदेशी परत नेले होते.

हेही वाचा: गॅस सिलेंडरवरील 'हा' कोड तुमच्या सुरक्षेशी संबंधीत; जाणून घ्या कसा?

पाकची हद्द टाळली

कंदाहारमधील भारतीय अधिकाऱ्यांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीचा वापर टाळल्याचे सूत्रांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या शस्त्रसंधी कराराची काटेकोर अंमलबजावणी होत असली तरी संबंध अद्यापही सुधारलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर हवाई दलाने पाकिस्तानची हद्द टाळण्याचा निर्णय घेतला.

loading image