शरीफ हे मोदींचीच योजना राबवत आहेत : इम्रान

पीटीआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

"नवाज शरीफ हे शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेले असताना आपल्या आई किंवा मुलांना फोन करण्याआधी त्यांनी सर्वांत पहिल्यांदा मोदींना फोन केला होता. सध्या ते मोदींच्याच योजना पाकिस्तानात राबवत असून, पाकिस्तानी सैन्याची गुप्त माहिती फोडण्यामागेही तेच आहेत''

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच योजना पाकिस्तानात राबवित असल्याचा आरोप आज माजी क्रिकेटर आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केला. पक्षाच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा आरोप केला आहे.
इम्रान खान आज एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, "नवाज शरीफ हे शस्त्रक्रियेसाठी लंडनला गेले असताना आपल्या आई किंवा मुलांना फोन करण्याआधी त्यांनी सर्वांत पहिल्यांदा मोदींना फोन केला होता. सध्या ते मोदींच्याच योजना पाकिस्तानात राबवत असून, पाकिस्तानी सैन्याची गुप्त माहिती फोडण्यामागेही तेच असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी कोणतीही गुप्त माहिती फोडली नसल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे; परंतु शरीफ यांनी रशीद यांची हकालपट्टी केली आहे. यामुळे परवेझ मुशर्रफ यांच्या हुकूमशाहीत आणि शरीफ यांच्या लोकशाहीत काहीच फरक दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांचा कायदेशीर संघ उद्या याप्रकरणी न्यायालयात जाणार असून, खान यांच्या घराकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना अडवण्यामागची कारणे काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीमार केल्याने अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: sharif implementing modi's plan, says imran