शिवछत्रपतींची न्यूयॉर्कमध्ये भव्य मिरवणूक; शिवकीर्तीचा डंका सातासमुद्रापार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

प्रचंड उत्साहात व हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जल्लोषात जगाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क मधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू हा भगवामय झाला होता.

न्युयॉर्क - भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यावर्षी १९ ऑगस्टला इंडिया डे परेडचे आयोजन न्युयॉर्क मध्ये यावेळी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तिरथ छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आला. अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेडमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात. 

२६ जानेवारीच्या राजपथावरील परेडप्रमाणे भारतीय संस्कृती व विविध देखावे/चित्ररथ, नृत्य इत्यादी सादर करतात. यावर्षी प्रथमच छत्रपती फाऊंडेशन न्युयॉर्क च्या वतीने या इंडिया परेड मध्ये 'शिवछत्रपती कीर्ती रथ' सादर करण्यात आला.

या रथावर पुढच्या भागात शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांची भूमिका युवकांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोशाखाद्वारे जिवंत केली. तर मागच्या भागात राष्ट्रमाता जिजाऊ बाळ शिवबांना मार्गदर्शन करत असल्याचा प्रसंग सादर अभिनायतुन दर्शविण्यात आला. 

कीर्तीरथासोबत अल्बनी (न्यूयॉर्क स्टेट) येथील १०० हून अधिक चमूने ढोल -ताशा व लेझीम नृत्यातून महाराष्ट्रातील लोककलेचा आगळावेगळा अनुभव अमेरिकेतल्या लोकांना दिला. 

प्रचंड उत्साहात व हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जल्लोषात जगाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क मधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू हा भगवामय झाला होता. New York Parade Life या वृत्तपत्राने शिवछत्रपती कीर्तिरथाला 'बेस्ट रथ' म्हणत शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाही मुळांशी जोडला आहे, असे नमूद केले. 

यावेळी शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, जिजाऊंची स्वराज्य संकल्पना व हिंदवी स्वराज्याचा इतिहासाबद्दल माहितीपत्रक सर्व उपस्थितांना वाटण्यात आले. या कीर्ती रथाचे स्वागत सर्वभारतीयासह न्युयॉर्कवासी यांनी मोठ्या उत्साहात केल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष न्युयॉर्क मधील इंडिया परेड मध्ये मोठ्या आवाजात व मोठ्या प्रमाणात घुमला. हा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा क्षण आहे.

मुख्यतः विद्यार्थी व तरुणांच्या नेतृत्वात छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क ही संस्था गेल्या ६ वर्षांपासून न्यूयॉर्क मध्ये शिवजयंती, जिजाऊजयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंतीच्या माध्यामातून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्कस्थित भारतीय दूतावासात शिवजयंतीचे आयोजन केले होते.

फाउंडेशनच्या विविध उपक्रमात या कार्यक्रमामुळे अजून एक माणाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातील युवकांच्या माध्यमातून अमेरिकेसह जगभरातील कार्य छत्रपती फाउंडेशनचे कार्य विस्तारत आहे. ही प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटणारी व प्रेरणा देणारी शक्ती बनली आहे.

शिवाजी महाराजांची कीर्ती, कर्तृत्व व विचारांचा प्रसार जगभर करण्याच्या दिशेने छत्रपती फाऊंडेशन सतत काम करीत असून हा कीर्तीरथ त्याचा एक दुवा असून यापुढे युनायटेड नेशन्शमध्ये शिवजयंती साजरी करून जिजाऊंना अपेक्षित असलेल्या स्वराज्य/शिवराज्याचा विचार जगभर पोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक स्वप्नील खेडेकर व अध्यक्ष विनोद झेंडे यांनी नमूद केले. तसेच शिवरायांच्या कार्यास वाहून घेत लोककलेद्वारे व महानाटयांच्या माध्यामातून प्रसार करीत असल्याचे अल्बनी ढोल ताशा पथकाचे संस्थापक अध्यक्ष कल्याण घुले यांनी म्हटले आहे. पथकातर्फे यावर्षी न्यूयॉर्क राज्याची राजधानी अल्बनी येथे शिवराज्यावर आधारित ऐतिहासिक नाट्य सादर केले होते. 

संयुक्त चमूच्या अग्रभागी तिरंग्यासह न्यूयॉर्क स्टेट युवती अध्यक्ष अलिशा मर्चंट होत्या. तर महिला वादक असलेल्या ढोल ताशा पथकाचे नेतृत्व शिल्पा घुले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती फाऊंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख गौरव दळवी, संघटनप्रमुख रूपेश नाइक, न्यूयॉर्क स्टेट अध्यक्ष प्रशांत भूसारी, न्यूजर्सी स्टेट अध्यक्ष रोहन रायगुडे, न्यूयॉर्क स्टेट उपाध्यक्ष अभिनव देशमुख व न्यूयॉर्क स्टेट युवक अध्यक्ष रिशिकेश माने व शरद कोट्टाकह यांनी अथक प्रयत्न केले. यास फाऊंडेशनचे मार्गदर्शक किशोर गोरे व दिलीप म्हस्के यांनी मोलाची दिशा दाखविली.

newyork

ढोलवादकांचे नेतृत्व राजेंद्र गाडे व जगदीश सोळंकी तर ताशावादकांचे नेतृत्व संदीप जाधव व अनिल कुलकर्णी यांनी केले. तर संपूर्ण पथकाचे संचालनाची जबाबदारी भूषण पाटील यांच्यावर होती. 

शिवछत्रपती किर्तीरथ हा २०१८ च्या न्यूयॉर्क परेडचा शो टॉपर ठरला. जल्लोश ग्रुपचे प्रमुख मुकुंद खिस्ती व आर्याबागचे कल्याण तावरे यांसह अनेक संस्थांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. 

भारतातून या न्युयॉर्क मधील इंडिया परेडसाठी प्रमुख पाहुणे दाक्षिणात्य अभिनेता श्री. कमल हसन, अनुपम खेर, श्रृती हसन तसेच क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स हे प्रमुख पाहुणे आवर्जून उपस्थित होते. फेडेरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्स या संस्थेतर्फे दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन केल्या जाते.

newyork

Web Title: Shiv Chhatrapatis grand procession in New York