अमेरिकेतील शीख नागरीकावरील हल्ला वर्णद्वेषातूनच

टीम ईसकाळ
शुक्रवार, 10 मार्च 2017

दीप राय यांच्यावरील हल्ला करणाऱयाचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले आहे. त्यानुसार, संबंधित हल्लेखोर सुमारे सहा फुट उंचीचा, मध्यम बांध्याचा आणि साधारणतः 35 ते 40 वर्षे वयाचा आहे. हल्ल्याच्या दिवशी त्याने गडद रंगाचे आणि चेहऱयाचा बराचसा भाग झाकला जाईल, असे पूर्ण बाह्यांचे जॅकेट घातले होते. शिवाय, त्याने चेहऱयावर बुरखाही घातला होता. 

वॉशिंग्टन : अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये शीख नागरीकावर गोळ्या झाडण्यामागे वंशभेद तथा वर्णद्वेष हेच कारण असल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे. चेहरा बुरख्यामागे दडवलेल्या हल्लेखोराने दीप राय (वय 39) यांच्यावर केन्ट येथील त्यांच्या घरासमोर 3 मार्च रोजी गोळ्या झाडल्या होत्या. 'तुमच्या देशात परत जा...' असे ओरडत हल्लेखोराने गोळीबार केला होता. 

 

हल्लेखोराचा ठावठिकाणा सांगणाऱयास पोलिसांनी 6000 डॉलर्स (सुमारे चार लाख रूपये) बक्षीस जाहीर केले आहे. राय घरासमोर उभे असताना अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी आधी वाद घातला आणि नंतर थेट गोळ्या झाडल्या होत्या.

राय यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर केवळ वांशिक भेदाच्या कारणातून गोळीबार झाला असल्याचे समजले आहे, असे केन्टचे पोलिस प्रमुख केन थॉमस यांनी सांगितले. अशा प्रकारचा द्वेष मान्य केला जाणार नाही, असा इशाराही थॉमस यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

 

राय यांच्यावरील हल्ल्यानंतर भारतीय वंशाच्या अमेरिकी समुदायात घबराट पसरली होती. पोलिसांनी आता संशयित हल्लेखोराचे रेखाचित्र तयार केले आहे. त्यानुसार, संबंधित हल्लेखोर सुमारे सहा फूट उंचीचा, मध्यम बांध्याचा आणि साधारणतः 35 ते 40 वर्षे वयाचा आहे. हल्ल्याच्या दिवशी त्याने गडद रंगाचे आणि चेहऱयाचा बराचसा भाग झाकला जाईल, असे पूर्ण बाह्यांचे जॅकेट घातले होते. शिवाय, त्याने चेहऱयावर बुरखाही घातला होता.  

 

केन्ट पोलिस आणि FBI या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करीत आहेत. आठवडाभरानंतरही हल्लेखोराचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांनी माहिती देणाऱयास सहा हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. 

गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर चालतच बेपत्ता झाला. 'अशा प्रकारचे द्वेषातून होणारे गुन्हे आमच्या समाजात खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणाचा तपास आम्ही कसोशीने करीत आहोत,' असे थॉमस यांनी सांगितले. 

राय यांनी डोक्यावर पगडी घातली होती. त्यामुळे, त्यांच्यावर ठरवूनच हल्ला केला गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे. एफबीआयच्या अधिकाऱयांनी सांगितले, की हल्लेखोराची माहिती देणाऱयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल. 

Web Title: Sikh in US was targeted because of his ethnic origin, hate crime