"सिल्क रोड'मधून पाकिस्तान बाहेर पडणार? 

"सिल्क रोड'मधून पाकिस्तान बाहेर पडणार? 

इस्लामाबाद : "सिल्क रोड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामार्फत भारताला शह देत अरबी समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या चीनचा हेतू सफल होण्याची शक्‍यता दिवसेंदिवस धूसर होत चालली असून, आता पाकिस्तानही यातून अंग काढून घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

'सिल्क रोड'द्वारे अरबी समुद्र व हिंदू कुशला जोडण्याची चीनची योजना आहे. या अंतर्गत येणाऱ्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे (बीआरआय) पाकिस्तानमधील कराची आणि पेशावर ही शहरेही एकमेकांशी जोडली जाणार असून, या प्रकल्पासाठी येणारा भलामोठा खर्च आणि त्यासाठी कर्ज देताना घालण्यात येणाऱ्या अटी पाहता पाकिस्तानमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने या प्रकल्पातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 

या प्रकल्पासंदर्भात झालेल्या करारांची पुनर्पडताळणी केली जाणार असून, यात चीनला झुकते माप दिल्याचा आरोप पाकिस्तानमधील काही अधिकाऱ्यांनी केला आहे. चीनची गुंतवणूक आम्हाला हवी आहे, मात्र वाजवी दरात असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

पंतप्रधानांचे सूचक वक्तव्य 

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशावरील वाढत्या कर्जाविषयी नुकतीच चिंता व्यक्त करीत सध्या देशावर असलेल्या विदेशी कर्जाचा भार हलका करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याचे सूतोवाच केले आहेत. आम्ही एक असे मॉडेल विकसित करू इच्छितो, की जेणेकरून सर्व जोखमीचा भार सरकारवर येऊ नये, असे सूचक विधानही नियोजन मंत्री खुसरो बख्तियार यांनी केले होते. यावरून या सरकारचा बीआरआय प्रकल्पाला असलेला विरोध प्रकर्षाने समोर आला आहे. 

चीनची सारवासारव 

दोन्ही देश बीआरआय प्रकल्पाच्या उभारणीसाठी कटिबद्ध असून, जे प्रकल्प तयार आहेत ते कार्यरत करणे आणि जे प्रकल्प निर्माणाधीन आहेत, त्यांचे काम हळुवारपणे सुरू ठेवले जाईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकल्पांची समीक्षा करण्याची तयारीही चीनने दर्शविली आहे. 

अमेरिकेशी वितुष्ठ भोवतेय 

अमेरिकेकडून पाकला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. मात्र, आता दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला असून, इतर कोणता देश पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यात तयार नाही. अशा स्थितीत आम्ही काय करायचे, असा प्रश्न एका मंत्र्याने उपस्थित केला. चालू खात्यातील तूट वाढत असून, अशात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बेलआऊट पॅकेजची गरज भासणार आहे. त्यात आयएमएफ खर्चात कपात करण्याची मागणीही करू शकते. 

सुरवातीला जोश; आता टाकली नांगी 

बीआरआय प्रकल्पावर सुरवातीपासून प्रश्न उपस्थित होत असताना या प्रकल्पामुळे भारताची चिंता वाढेल, या कारणास्तव पाकिस्ताने सुरवातीला आवेशात या प्रकल्पासंबंधी करारावर सह्या केल्या. मात्र, इतर देशांकडून होणारा विरोध व त्यामागची कारणे समोर आल्यानंतर पाकिस्तान आता यातून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे. 

या देशांचा आहे विरोध 

श्रीलंका, मालदीव आणि मलेशियातील प्रकल्पांत चीनने केलेल्या गुंतवणुकीचे वास्तव आता समोर येत आहे. या देशांतील प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी चीनने कठोर अटींवर कर्ज दिले. मात्र, ही कर्जे त्यांची डोकेदुखी बनली आहेत. मलेशियाने तर या कर्जापोटी देश दिवाळखोरीत निघण्याची शक्‍यता व्यक्त करीत याला उघड विरोध केला असून, श्रीलंकाही त्याच मार्गावर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com