पाकिस्तानमधील रक्तपातानंतर ट्‌विटरवरुन आक्रोश...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

लाल शाहबाझ हा पाकिस्तानमधील सर्वांत वर्दळ असलेला दर्गा आहे. मात्र तरीही सेहवान शरीफमध्ये एकही मोठे रुग्णालय नाही. पाकिस्तानची स्थिती खरेच किती दु:खदायक आहे

कराची - पाकिस्तानातील सिंध प्रांतामधील सेहवान शहरात असलेल्या लाल शाहबाझ कलंदर या सुफी संताच्या प्रख्यात दर्ग्यामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटेनेने घडविलेल्या आत्मघातकी स्फोटामध्ये मृत्यु आलेल्या नागरिकांची संख्या आता 80 वर जाऊन पोहोचली आहे.

हैदराबाद या सिंधमधील एका महत्त्वपूर्ण शहरापासून हे ठिकाण 130 किमी अंतरावर आहे. "हे ठिकाण दुर्गम भागामध्ये असल्याने जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा पोहोचविण्यात यश न आल्याची,' भूमिका येथील प्रशासनातर्फे घेण्यात आली आहे. मात्र या दर्ग्यात अनेक नागरिक अक्षरश: अखेरच्या घटका मोजत असताना वैद्यकीय मदतीस अक्षम्य विलंब केल्याबद्दल येथील प्रशासनातर्फे देण्यात येत असलेल्या या व अशा स्वरुपाच्या फुटकळ कारणांचा पाकिस्तानमधील "ट्‌विटर युजर्स'नी चांगलाच समाचार घेतला आहे.

याचबरोबर, ग्रामीण सिंध भागामध्ये रुग्णालयेही बांधु न शकलेल्या सत्ताधारी पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी) पक्षावरही पाकिस्तानी नागरिकांनी ट्‌विटरच्या माध्यमामधून सडकून टीका केली आहे.

या स्फोटामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना पहिली तातडीची वैद्यकीय मदत ही जमशोरो येथून पुरविण्यात आली होती. हे ठिकाण घटनस्थळाहून तब्बल दोन तासांच्या अंतरावर आहे. "या दर्ग्यापासून सर्वांत जवळ असलेले रुग्णालय हे दुसऱ्या शहरात, दोन तासांच्या अंतरावर असल्याच्या' वस्तुस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

या घटनेवर व्यक्त करण्यात आलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया -

सेहवानमध्येही एकही रुग्णवाहिका नाही. लाल शाहबाझ कलंदर दर्ग्यामधील स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना रिक्षा आणि दुचाकींवरुन हलविण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे - अमर गुरिरो

पीपीपीची सत्ता असलेल्या प्रांतामध्ये रुग्णवाहिका नाही, सोयी सुविधा नाहीत, सुरक्षा व्यवस्था नाही. या स्थितीचे वर्णन शब्दांत होणे शक्‍यच नाही. अश्रुच कदाचित ते काम करु शकतील - अदीना कादीर 

लाल शाहबाझ हा पाकिस्तानमधील सर्वांत वर्दळ असलेला दर्गा आहे. मात्र तरीही सेहवान शरीफमध्ये एकही मोठे रुग्णालय नाही. पाकिस्तानची स्थिती खरेच किती दु:खदायक आहे - स्येदिह 

सेहवानमध्ये मदतकार्य नाही, डॉक्‍टर्स नाहीत, रस्ते नाहीत, वीजपुरवठादेखील नाही. रुग्णशय्या नाहीत, औषधे नाहीत. शस्त्रक्रिया गृहे चालु नाहीत. परंतु चिंता करु नका. भुट्टो झिंदा हैं....- अनी खान

सेहवान हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि तेथे एकही मोठे रुग्णालय नाही. जखमींसाठी हैदराबादहून रुग्णवाहिका येत आहेत...- जनौद अहमद दहार

सेहवान येथे गेल्या 70 वर्षांत एकही रुग्णालय बांधणारे सिंध सरकारही या रक्तपातास जबाबदार आहे - शेहझाद हमीद अहमद 

पाकिस्तानमधील पेशावर येथे 2015 मध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या भीषण हल्ल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणत्मक कार्यक्रमाचेही हे अपयश असल्याचे परखड काही ट्‌विटर युजर्सनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानला गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी सतत लक्ष्य केले आहे. या पाऱ्श्‍ग्वअभूमीवर, येथील सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत प्रतिक्रिया या एकंदरच येथील व्यवस्थेविषयी नैराश्‍य व्यक्त करणाऱ्या आहेत.

Web Title: Social media slams PPP after Sehwan blast