ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून मुस्लिम महिला चिंतेत!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी वेळोवेळी मुस्लिम-अमेरिकन नागरिकांवर टीका केली होती. त्यांनी मुस्लिमांसाठी अमेरिकेची दारे बंद असतील आणि मुस्लिम लोकांना शोधण्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी समर्थन असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आपण मुस्लिम आहोत हे इतरांना ओळखू येऊ नये म्हणून हिजाब घालण्यास महिलांना भीती वाटत आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर जगभरात वेगवेगळे परिणाम जाणवत आहेत. शेअर बाजारावरही परिणाम दिसून आला आहे. आता मुस्लिम महिला चिंतेत असल्याचे चित्र समोर आले असून अमेरिकेतील मुस्लिम महिलांना हिजाब घालण्याची भीती वाटत असल्याचे आढळून आले आहे.

ट्रम्प निवडून आल्यानंतर अमेरिकेतील मुस्लिम महिला सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एका महिलेने 'माझ्या आईने मला स्पष्टपणे सांगितले आहे की कृपया हिजाब घालू नको. आमच्या कुटुंबातील ती घरातील सर्वांत धार्मिक आहे', असे ट्विट जनातिन नावाच्या महिलेने केले आहे. तर मेरी खलाफ नावाच्या महिलेने 'मी हिजाब घातलेला पाहून माझे पती उडालेच. त्यांना अचानक भीती वाटू लागली. त्यांनी मला विनंती केली की मी हिजाब घालू नये', असा अनुभव ट्विट केला आहे. तर अन्य एका महिलेने 'हिजाब परिधान करण्याची मला खरोखरच भीती वाटत आहे. मला असे कधीही वाटले नव्हते. कधीच नाही' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी वेळोवेळी मुस्लिम-अमेरिकन नागरिकांवर टीका केली होती. त्यांनी मुस्लिमांसाठी अमेरिकेची दारे बंद असतील आणि मुस्लिम लोकांना शोधण्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी समर्थन असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आपण मुस्लिम आहोत हे इतरांना ओळखू येऊ नये म्हणून हिजाब घालण्यास महिलांना भीती वाटत आहे.

Web Title: Some Muslim Women Are Afraid to Wear the Hijab After Donald Trump’s Victory