अवकाशक्रांतीच्या दिशेने 'स्ट्रॅटोलॉंच'

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

कॅलिफोर्निया - अवकाश तंत्रज्ञान विकसित होत असतानाच यामधील स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिकेत खासगी अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश केंद्रे निर्माण झाली आहेत. अनेक श्रीमंत व्यक्तींनी या क्षेत्रात पदार्पण केले आहे. यामध्येच आता मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल ऍलन यांनीही उडी घेतली आहे. 

कॅलिफोर्निया - अवकाश तंत्रज्ञान विकसित होत असतानाच यामधील स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिकेत खासगी अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश केंद्रे निर्माण झाली आहेत. अनेक श्रीमंत व्यक्तींनी या क्षेत्रात पदार्पण केले आहे. यामध्येच आता मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल ऍलन यांनीही उडी घेतली आहे. 

अनेक वर्षे गुप्त ठेवल्यानंतर ऍलन यांनी जगातील सर्वांत मोठे विमान बनविण्याची आपली योजना नुकतीच उघड केली आहे. अब्जाधीश असलेले ऍलन हे एका फुटबॉलच्या स्टेडियमएवढी लांबी असलेले विमान बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. "स्ट्रॅटोलॉंच‘ असे या विमानाचे नामकरण करण्यात आले आहे. राईट बंधूंनी आपल्या पहिल्या विमानाद्वारे जितके अंतर कापले होते, तेवढा तर या विमानाच्या पंखांचा विस्तारच असेल. इतके मोठे विमान तयार करण्याचा हेतूही ऍलन यांनी स्पष्ट केला आहे. 
 

या अतिप्रचंड विमानातून ऍलन यांना रॉकेटचेच वहन करायचे आहे. आपल्या पोटात एखादे रॉकेट घेऊन विमान जमिनीपासून 35 हजार फुटावर जाईल आणि तेथून रॉकेट सोडून देईल, त्यानंतर लगेचच रॉकेटमधील इंजिन सुरू होऊन ते एखाद्या उपग्रहाला त्याच्या नियोजित कक्षेत नेऊन सोडेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाश तंत्रज्ञानात क्रांती होऊन हवेतून प्रक्षेपण करण्याचा नवा पर्याय शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहे, असा दावा ऍलन यांच्या व्हल्कन एअरोस्पेस या कंपनीकडून करण्यात येत आहे. या विमानामुळे पृथ्वीच्या जवळच्या कक्षेमध्ये जाऊन प्रक्षेपण करणे नित्याचे होऊ शकेल आणि त्यामुळे नवनवीन संकल्पना साकार करण्यासाठी विविध प्रयोग करण्यासही मोठे प्रोत्साहन मिळेल, असाही त्यांचा दावा आहे. 
 

अवकाश तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणण्याचे ऍलन यांचे स्वप्न आहे. तीस वर्षांपूर्वी सामान्यांसाठी दुर्मिळ असणारा संगणक आता प्रत्येकाच्याच हातात आल्याने त्यांच्या कल्पकतेने या क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली आहे. त्याचप्रमाणे अवकाशात जाणेही सहज झाल्यावर अनेक नव्या संकल्पना प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही, असे ऍलन यांना वाटते. या विमानाचा आकार आणि क्षमता पाहता मोठे उपग्रह वाहून नेणाऱ्या प्रक्षेपकांना प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता आहे. या विमानाचे काम 76 टक्के पूर्ण झाले असून, 2020 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. 

स्ट्रॅटोलॉंचची वैशिष्ट्ये 
13 : लाख पौंड वजन 
2 : फ्युजलॅग (विमानाचा मुख्य भाग) 
385 : फूट विमानाच्या पंखांचा विस्तार 
238 : फूट विमानाची लांबी 
6 : 737 इंजिनची शक्ती 
60 : मैल लांबी होणारे वायरचे जाळे 
275 : टन वजनाचे रॉकेट वहनाची क्षमता 
35 हजार : फूट उंचीपर्यंत जाणार 

Web Title: space revolution