'स्पेस-एक्स'च्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

केनेडी स्पेस सेंटर येथे मानवरहित फाल्कन-9 रॉकेटचे उड्डाण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

केप कॅनव्हेरल (फ्लोरिडा) : सुमारे 50 वर्षांपूर्वी चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांनी जिथून उड्डाण केले त्या 'नासा'च्या लाँच पॅडवरून स्पेस-एक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे रविवारी प्रक्षेपण करण्यात आले. अवकाश स्थानकाला पुरवठा करण्यासाठी हे रॉकेट सोडण्यात आले आहे. 

चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यासाठी येथील लाँचपॅड वापरले जाते. प्रदीर्घ काळापासून ते वापरले गेले नव्हते. अंतराळातील ये-जा करण्याची मोहीम (शटल प्रोग्रॅम) सहा वर्षांपूर्वी संपल्यानंतर नासाचे अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे लाँच काँप्लेक्स 39ए प्रथमच उड्डाणासाठी वापरण्यात आले. 

अमेरिकेतील अवकाशसंबंधी निर्मिती आणि वाहतूक करणारी अवकाश संशोधन तंत्रज्ञान महामंडळ तथा स्पेस-एक्स ही संस्था आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात एका रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर स्पेस-एक्सच्या वतीने प्रथमच फ्लोरिडातून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. 

केनेडी स्पेस सेंटर येथे मानवरहित फाल्कन-9 रॉकेटचे उड्डाण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे माल वाहून नेणारे हे रॉकेट आकाशात झेपावल्यानंतर 10 सेकंदांत ढगांमध्ये गायब झाले. 
 

Web Title: SpaceX Launches Rocket from NASA's Historic Moon Pad