
श्रीलंकेने मागितले भारताकडे कर्ज
कोलंबो - श्रीलंकेला परकी चलन टंचाईचा सामना करावा लागत असताना आज मंत्रिमंडळाने पेट्रोलियम उत्पादनाच्या खरेदीसाठी भारतीय एक्झिम बँकेकडे ५० कोटी अमेरिकी डॉलरचे कर्ज मागण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पेट्रोल पंपावरच्या रांगा कमी करण्यासाठी श्रीलंका सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
परकी चलनाची टंचाई जाणवत असल्याने आयातीचे बिल भरण्यास श्रीलंकेला अडचणी येत आहेत. ऊर्जामंत्री कंनचा विजेसेकरा यांनी सांगितले की, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय एक्झिम बँकेकडून ५० कोटी डॉलरचे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली. या कर्जातून इंधन खरेदी करण्यात येणार आहे.
श्रीलंकेला यापूर्वीच तेल खरेदीसाठी भारतीय एक्झिम बँकेकडून ५० कोटी डॉलर आणि भारतीय स्टेट बँकेकडून २० कोटी डॉलर मिळाले आहेत. श्रीलंकेला मदत करताना आरबीआयने श्रीलंकेशी रुपयांतून व्यवहार करण्याची भारत सरकारला परवानगी दिली होती. निर्यातदारांना श्रीलंकेकडून बिल वसूल करताना येणाऱ्या अडचणी येत असल्याने आरबीआयने निर्णय घेतला होता.
पुन्हा इंधन दरवाढ
मंगळवारी पेट्रोलच्या किमतीत २४.३ टक्के आणि डिझेलच्या किमतीत ३८.४ टक्के वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऑक्टेन ९२ पेट्रोलची किंमत ४२० रुपये (१.१७ डॉलर) प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ४०० रुपये (१.११ डॉलर) प्रति लिटर झाली आहे. हा इंधनदरवाढीचा उच्चांक आहे.
Web Title: Sri Lanka Seeks Loan From India Fuel Foreign Currency
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..