10 हजार सीरियन निर्वासितांना "स्टारबक्‍स'कडून नोकरी

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

स्टारबक्‍सच्या जगभरातील शाखांमध्ये या सीरियन निर्वासितांना सामावून घेतले जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात अर्थातच अमेरिकेमधून केली जाणार आहे

न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सीरियन निर्वासित व इतर सहा मुस्लिम देशांमधील नागरिकांवर अमेरिका प्रवेशासंदर्भात बंदी लादण्याच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करत स्टारबक्‍स या जगप्रसिद्ध कॉफी कंपनीने येत्या पाच वर्षांत तब्बल 10 हजार सीरियन निर्वासितांना नोकरी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

स्टारबक्‍सच्या जगभरातील शाखांमध्ये या सीरियन निर्वासितांना सामावून घेतले जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात अर्थातच अमेरिकेमधून केली जाणार आहे. ""अमेरिकेच्या सैन्यदलास मदत करणाऱ्या' निर्वासितांना मदत करण्यावर कंपनीचा भर असल्याचे स्टारबक्‍सचे अध्यक्ष हॉवर्ड शुल्ट्‌झ यांनी सांगितले. याचबरोबर, स्टारबक्‍स मेक्‍सिकोमधील कॉफी उत्पादक शेकऱ्यांनाही "मदत' करेल, असा निर्धार शुल्ट्‌झ यांनी व्यक्त केला.

शुल्ट्‌झ यांनी अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांना पाठिंबा व्यक्त केला होता. या पार्श्‍वभूमीवर, ट्रम्प यांच्या धोरणांना ठाम विरोध व्यक्त करण्याची स्टारबक्‍सची भूमिका सूचक मानली जात आहे.

Web Title: Starbucks to hire 10,000 syrian refugees