भारतावर आरोप करणे बंद करा; नेपाळच्या पंतप्रधानांना पक्षातील नेत्यांनीच सुनावलं

बुधवार, 1 जुलै 2020

भारतावर गंभीर आरोप करणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ओली यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली-  भारतावर गंभीर आरोप करणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकरणी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ओली यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

नवी दिल्ली आपल्याला सत्तेतून घालवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या कामासाठी त्यांना नेपाळमधील काही नेते मदत करत आहेत, असा आरोप केपी शर्मा ओली यांनी मागील आठवड्यात केला होता. यावर माजी पंतप्रधान आणि नेपाळ  कम्युनिस्ट पार्टीचे नेते  पुष्प कमल दहल प्रचंड चांगलेच आक्रमक झाले आहेत. भारतासारख्या शेजारी राष्ट्रावर ओली यांनी केलेले आरोप राजनैतिक आणि कुटनैतिक दृष्ट्या चुकीचे आहेत. ओली यांच्या वक्तव्यामुळे आपल्या देशाचे शेजारी राष्ट्रासोबत असलेले संबंध बिघडू शकतात, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

भारतीय प्रसारमाध्यमांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय; चीनमध्ये
कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्प कमल दहल प्रचंड, माधाव नेपाल, जाला नाथ खनाल आणि बामदेव गौतम यांनी पक्षाच्या 44 व्या बैठकीत ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ओली योग्यरीत्या सरकार चालवण्यास अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी ते भारताला दोषी ठरवत आहेत, असा आरोप नेत्यांनी बैठकीत केला आहे. त्यामुळे ओली यांना देशातूनच मोठा विरोध होताना दिसत आहे.

कालापाणी, लिपियाधुरा आणि लिपूलेख हे भूभाग नव्या नकाशावर दाखवल्यामुळे आपला शेजारी राष्ट्र नाराज झाला आहे. त्यामुळे मी पायउतार व्हावे यासाठी भारत प्रयत्न करत आहे. आपल्या देशातील काही पक्षानांही भारताची फूस आहे, असा गंभीर आरोप ओली यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे नेते नाराज झाले आहेत. ओली आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी भारतावर दोषारोप करत आहेत, असं म्हणत प्रचंड यांनी हल्ला चढवला आहे. ओली यांनी पंतप्रधान पदावरुन पायउतार व्हावं किंवा मला पक्षाचे अध्यक्षपद सोडावं लागेल, असा इशारा प्रचंड यांनी दिला आहे.

RBI चे नवे बाँड एक जुलैपासून बाजारात, जाणून घ्या काय आहे खास
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिकेमुळे दोन्ही देशातील संबंध तणावाचे बनले आहेत. नेपाळने संविधानात दुरुस्ती करुन भारताचा भूभाग आपल्या नकाशात नव्याने समावेश केला आहे. यावर भारताकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, ओली यांनी आपली विरोधाची भूमिका सुरुच ठेवली असून भारतावर आगपाखड केली आहे. तसेच भारत नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.