दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवा; अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले

वृत्तसंस्था
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही पाकला खडे बोल सुनावले आहेत.

वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही पाकला खडे बोल सुनावले आहेत. पाकने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे थांबवावे, तसेच त्यांना सुरक्षित आश्रयस्थळेदेखील पुरवू नयेत, असे सुनावतानाच अमेरिकेने पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे.

"व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव साराह सॅंडर्स यांनी गुरुवारी मध्यरात्री या संदर्भातील निवेदन प्रसिद्ध केले आहे. या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधातील लढ्यासाठी भारत अमेरिकेने केलेला निर्धार आणि समन्वय अधिक भक्कम होईल. आम्ही या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त करतो, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान अमेरिकेतील अनेक लोकप्रतिनिधींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटमधील नेते चक शुमेर यांनी म्हटले आहे की, "अमेरिका भक्कमपणे भारताच्या पाठीशी उभी आहे' तर अन्य एक सिनेटर रॉबर्ट मेननडेझ यांनीही हल्ल्यानंतर शोक व्यक्त करत "1989 पासूनचा हा सर्वांत भयावह हल्ला' असल्याचे म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉनी इस्कॉसन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला असून, दहशतवादाला पराभूत करण्याच्या लढ्यात आमचा भारताला पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop supporting terrorists says America