Sushma Swaraj
Sushma Swaraj

काश्मीर आमचेच;सुषमा स्वराज यांनी ठणकावले

न्यूयॉर्क : "भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे,‘ असा आरोप पाकिस्तानने याच मंचावरून केला होता. पण बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान काय करत आहे? तिथे तर अत्याचारांची परिसीमा आहे,‘‘ अशा घणाघाती शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (सोमवार) पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून सडेतोड प्रत्युत्तर दिले.‘दहशतवादाविरोधात लढण्याची एखाद्या देशाची तयारी नसेल, तर आंतरराष्ट्रीय समूहातून त्याला दूर केले पाहिजे,‘ अशी ठाम भूमिकाही स्वराज यांनी मांडली. 

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा काश्‍मीरचे तुणतुणे वाजवले होते. दहशतवादाविषयी संपूर्ण जग चिंता व्यक्त करत असताना पाकिस्तानने मात्र काश्‍मीरमधील दहशतवादी बुऱ्हाण वणीला ‘नेता‘ म्हणून संबोधले होते. या प्रभावहीन भाषणात पाकिस्तानने केलेल्या आरोपांवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज काय उत्तर देणार, याविषयी जगभरात उत्सुकता होती. 

या बहुप्रतिक्षित भाषणाची सुरवात करताना सुषमा स्वराज यांनी गरिबी आणि विकास या मुद्यांवर भारताची भूमिका मांडली. ‘जगाच्या कानाकोपऱ्यात असलेली गरिबी हे सर्वांत मोठे आव्हान आहे. गरिबी दूर केल्याशिवाय जगात शांतता आणि समृद्धी नांदू शकत नाही,‘ असे सांगत त्यांनी या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समूहाने सहाय्य  करणे आवश्‍यक असल्याचेही सांगितले. ‘जगातील एक षष्ठांश लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळे शाश्‍वत विकासाचे प्रयत्न भारतात यशस्वी झाले, तर जगातही त्याची अंमलबजावणी करता येईल,‘ असेही स्वराज म्हणाल्या. 

नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैली, यांविषयीही स्वराज यांनी भारताची भूमिका मांडली. त्यानंतर दहशतवादाचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले. 


सुषमा स्वराज म्हणाल्या, "न्यूयॉर्कमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या 9/11 च्या भीषण हल्ल्याला याच महिन्यात 15 वर्षे पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी पॅरिससह इतर शहरांमध्येही हल्ले झाले. आमच्यावरही पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवादाशी लढायचे असेल, तर ‘दहशतवाद हे मानवाधिकारांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे‘ ही गोष्ट सर्वांनी मान्य करायलाच हवी. दहशतवाद हा कोणत्याही एका देशाचा विषय नाही. ते संपूर्ण मानवतेचे शत्रू आहेत. मग या दहशतवाद्यांना आश्रय कोण देते, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवते आणि प्रशिक्षण कोण देते, याचाही विचार झाला पाहिजे. काही देश अशा दहशतवाद्यांना आश्रय आणि समर्थन देत आहेत. काही दिवसांपूर्वी याच मंचावरून अफगाणिस्ताननेही अशीच भूमिका मांडत याविषयी चिंता व्यक्त केली होती. छोटे छोटे हल्ले करणारे दहशतवादी एकत्र येऊन आता त्यांचा राक्षस झाला आहे. या दहशतवाद्यांमध्ये ‘चांगला-वाईट‘, ‘आमचे-तुमचे‘ असे वर्गीकरण करता येणार नाही. दहशतवादाशी लढायचे असेल, तर सर्वांनी एकत्र यायला हवे. यासाठी आपांसातील मतभेद दूर करावे लागतील. हे अशक्‍य काम नाही. इच्छाशक्ती असेल तर करता येईल. ही लढाई कठीण असली, तरीही पुढच्या पिढीसाठी आपल्याला ते करावे लागेल.‘‘ 

दहशतवादाविषयी कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत ‘ज्यांना ही लढाई लढायची नसेल, त्यांना आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय समूहात काहीही स्थान नाही,‘ अशी ठाम भूमिकाही स्वराज यांनी घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com