समलिंगी विवाहांना तैवानमध्ये मान्यता; आशियातील पहिला देश

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

समलिंगी विवाहांना मान्यता देण्याच्या निर्णयामुळे सामाजिक स्थैर्य आणि मानवी प्रतिष्ठा जपण्यास मदत होईल. 
- घटनापीठ, तैवान 

तैपेई : तैवानमधील न्यायालयाच्या घटनापीठाने समलिंगी विवाहाच्या बाजूने बुधवारी निकाल दिला. यामुळे समलिंगी विवाहांना मान्यता देणारा आशियातील पहिला देश ठरण्याच्या दिशेने तैवानने वाटचाल सुरू केली आहे. 

घटनापीठाने म्हटले, की सध्याच्या नागरी कायद्यात फक्त स्त्री आणि पुरुषांमध्ये विवाह होऊ शकतो, असे म्हटले आहे. यामुळे व्यक्तीच्या विवाह स्वातंत्र्य आणि समानतेच्या घटनात्मक हक्कांवर गदा येत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला दोन वर्षांचा कालावधी देण्यात येत आहे. संसदेने दोन वर्षांत बदल न केल्यास समलिंगी जोडपी कायद्याची पर्वा न करता विवाहाची थेट नोंदणी करू शकतील. 

तैवानमध्ये मागील काही काळापासून समलिंगी विवाहांना मान्यता देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हजारो नागरिक यासाठी रस्त्यांवर उतरून निदर्शने करीत आहेत. मात्र, याला परंपरावादी गटांचा विरोध असून, या गटांनीही कायद्यात बदल करण्याविरोधात निदर्शने केली आहेत. आजचा निकाल ऐकण्यासाठी दोन्ही बाजूंच्या गटांनी राजधानी तैपेईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

Web Title: taiwan first asian country to approve gay marriages