अफगाणिस्तानात मोठा आत्मघाती हल्ला

पीटीआय
गुरुवार, 18 मे 2017

आज झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. नंगरहार प्रांत हा इसिसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच भागात अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इसिसच्या ठिकाणांना लक्ष्य करत बॉंब हल्ला केला होता

जलालाबाद - अफगाणिस्तानात जलालाबाद शहरातील सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यालयावर आज आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, त्यात दहा जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी उशिरापर्यंत दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमक सुरू होती. इमारतीमध्ये अनेक जण अडकून पडले असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, "इसिस'ने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतातील जलालाबाद येथील "रेडिओ टेलिव्हिजन अफगाणिस्तान' (आरटीए) या सरकारी मालकीच्या दूरचित्रवाणीचे कार्यालय असलेल्या इमारतीमध्ये सकाळी चार आत्मघाती दहशतवाद्यांनी प्रवेश केला. दोघा आत्मघातकी दहशतवाद्यांनी स्वतःला उडवून दिल्यानंतर दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यालयात एकापाठोपाठ एक स्फोट झाले. उर्वरित दोन दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी "आरटीए'च्या इमारतीला वेढा दिला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. रात्री चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याचा दावा सरकारी प्रवक्‍त्याने केला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दूरचित्रवाणी कंपनीचे चार कर्मचारी आणि दोन पोलिसांचा समावेश आहे.

या हल्ल्यात दोन सामान्य नागरिक ठार झाले असून, 14 जण जखमी झाले आहेत. अनेक जण इमारतीमध्ये अडकले होते. अलीकडील काळात अफगाणिस्तानात माध्यम संस्थांवर "इसिस'कडून अनेकदा हल्ले केले जात आहेत. 2016मध्ये अफगाणिस्तानात 13 पत्रकारांना प्राण गमवावे लागले आहेत.

"इसिस'चा बालेकिल्ला
आज झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. नंगरहार प्रांत हा इसिसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच भागात अमेरिकेने काही दिवसांपूर्वी इसिसच्या ठिकाणांना लक्ष्य करत बॉंब हल्ला केला होता. मदर ऑफ ऑल बॉंब म्हणून ओळखला जाणाऱ्या या बॉंबमुळे इसिसचे मोठे नुकसान झाले होते. या भागात इसिसचे आठ हजार दहशतवादी असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी सध्या आठशे दहशतवादी शिल्लक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

Web Title: Terror attack in Afghanistan