बार्सिलोना हल्ला: अस्वस्थ स्पेनमध्ये दहशतवाद्यांचा कसून शोध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र इसिसचा हा दावा अद्याप पडताळून पाहण्यात आलेला नाही. या हल्ल्यानंतर हल्लेखोर झपाट्याने ट्रकमधून उतरुन पसार झाला

बार्सिलोना - स्पेनमधील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बार्सिलोना येथे गर्दीमध्ये चालता ट्रक घुसवून 13 नागरिकांचे प्राण घेणाऱ्या दहशतवाद्याचा येथील सुरक्षा दलांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. बार्सिलोना येथील दहशतवादी हल्ला "इस्लामिस्ट' दहशतवाद्यांकडून घडविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडविण्याची दहशतवाद्यांची योजना असल्याची भीतीही या पार्श्‍वभूमीवर व्यक्त करण्यात आली आहे.

इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र इसिसचा हा दावा अद्याप पडताळून पाहण्यात आलेला नाही. या हल्ल्यानंतर हल्लेखोर झपाट्याने ट्रकमधून उतरुन पसार झाला. बार्सिलोनाच्या दक्षिणेस असलेल्या कॅंबर्लिस येथे काल (गुरुवार) राबविण्यात आलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. बार्सिलोना येथील हल्ला या कारवाईशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.

या प्रकरणी तपास करताना सुरक्षा दलांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांपैकी एक महिला आहे. मात्र दहशतवादी हल्ला घडविणाऱ्या ट्रक चालकास अटक करण्यात अद्याप यश आलेले नाही.

Web Title: Terror strikes Spain