तंत्रज्ञान क्षेत्राची दहशतवादाविरोधात एकजूट

पीटीआय
बुधवार, 7 डिसेंबर 2016

ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, यू ट्यूब एकत्रित डेटाबेस तयार करणार
वॉशिंग्टन - इंटरनेटवरून दहशतवादाविषयी मजकुराचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सत्तांकडून दबाव येऊ लागल्याने तंत्रज्ञात क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी यासाठी एकत्र पाऊल उचलले आहे.

ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, यू ट्यूब एकत्रित डेटाबेस तयार करणार
वॉशिंग्टन - इंटरनेटवरून दहशतवादाविषयी मजकुराचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सत्तांकडून दबाव येऊ लागल्याने तंत्रज्ञात क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी यासाठी एकत्र पाऊल उचलले आहे.

ट्विटर, मायक्रोसॉफ्ट आणि यू ट्यूब या कंपन्यांनी माहितीची देवाणघेवाण आणि दहशतवाद पसरविणारा मजकूर तसेच व्हिडिओ काढून टाकणे व त्यांच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी एकत्र काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी या कंपन्या एकत्रित डेटाबेस तयार करणार आहेत. या डेटाबेसमध्ये डिजिटल फिंगरप्रिंट, छायाचित्रे आणि व्हिडिओ असतील. यामुळे कंपन्यांना दहशतवादाचा प्रसार करणारा मजकूर शोधणे सोपे होणार आहे. दहशतवादी संघटनांचा इंटरनेटवर पसरणारा मजकूर रोखण्याचे आव्हान मागील काही काळापासून तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांपुढे आहे.

इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थकांनी सोशल मीडियाचा वापर विचारसरणीचा प्रसार आणि तरुणांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रभावीपणे केल्याचे दिसून आले आहे. आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांची अमेरिकी अधिकाऱ्यांसोबत जानेवारीमध्ये बैठक झाली होती. यात दहशतवादी कशाप्रकारे सोशल मीडियाचा वापर करतात आणि तरुणांची भरती करतात, याविषयी चर्चा झाली होती.

ऑगस्टमध्ये ट्विटरने दहशतवादाचा प्रसार करणारी लाखो अकाउंट बंद केली होती. यावरून कंपनीला टीकेलाही सामोरे जावे लागले होते. तसेच, ट्विटर आणि फेसबुकच्या संस्थापकांना इसिसच्या समर्थकांनी धमक्‍याही दिल्या होत्या. ओबामा प्रशासनाने जुलैमध्ये म्हटले होते, की मागील दोन वर्षांत इसिसचा ट्विटरवरील प्रचार कमी झाला आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध दहशतवाद
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे आणि बेकायदा कारवाया व पायरसीला प्रतिबंध करणे यातील संतुलन राखण्याचे आव्हान तंत्रज्ञान कंपन्यांसमोर आहे. तसेच, दहशतवादी मजकूर म्हणजे काय, याचीही त्यांना व्याख्या वारंवार ठरवावी लागत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये, म्हणूनही कंपन्यांना दक्ष राहावे लागत आहे.

Web Title: Terrorism united technology sector