ब्रिटिश संसदेसमोर दहशतवादी हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

ब्रिटीश पार्लमेंटसमोरील प्रसिद्ध वेस्टमिन्स्टर ब्रिजवर भरघाव मोटारीखाली चिरडून नागरीकांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती.

लंडन - मोटारीखाली नागरीकांना चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न दहशतवाद्याने लंडनमध्ये ब्रिटीश पार्लमेंटसमोरील प्रसिद्ध वेस्टमिन्स्टर ब्रिजवर केल्याचे उघडकीस येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने चाकूने पोलिसावरही वार केले आहेत. पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला गोळ्या घालून संपविले आहे. 
 
हल्ल्यामध्ये किमान बारा लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी एका जखमी महिलेचा मृत्यू झाला आहे. ब्रिटीश वेळेनुसार दुपारी 2.40 वाजता हा हल्ला झाला. करड्या रंगाच्या ह्युंडाई आय 40 कारने अचानक पादचाऱयांच्यादिशेने मोर्चा वळवला आणि लोकांना गाडीखाली चिरडण्यास सुरूवात केली, असे द टेलिग्राफ या लंडनमधील वर्तमानपत्राने म्हटले आहे.
 
संसदेसमोरील रेंलिगला धडकून कार थांबली. त्यानंतर संसदेच्या गेटच्या दिशेने एक व्यक्ती हातात चाकू घेऊन धावत सुटली. त्या व्यक्तीने एका पोलिसावर हल्ला चढविला. दरम्यानच्या काळात अन्य पोलिसांनी सावध होत हल्लेखोरावर गोळ्या झाडल्या. त्यात हल्लेखोर जागीच ठार झाला, असे द टेलिग्राफने म्हटले आहे. द मिरर या वर्तमानत्राच्या वेबसाईटवर संशयित हल्लेखाराचे छायाचित्र प्रसिद्ध झाले असून हल्लेखोर आशियाई असल्याचे दिसते आहे.

आधीच्या वृत्तानुसार हल्लेखोराने वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून ब्रिटीश संसदेच्या दिशेने कूच केले. त्याने वाटेत अनेक पादचाऱयांवर चाकूहल्ला केला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, असे 'बीबीसी'ने म्हटले आहे. हल्लेखोराने पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरकडे येताना एका पोलिसाला भोसकले. हल्लेखोराने आणखी पुढे येण्याच्या आत पोलिसांनी गोळ्या घालून त्याला संपवले.

हल्ल्याची घटना घडली, तेव्हा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे संसदेतच होत्या. त्या सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना संसदेच्या आवारात चंदेरी रंगाच्या जग्वार मोटारीतून सुरक्षित स्थळी नेण्यात आले, त्यावेळी संसद परिसरात गोळीबाराचे आवाज आल्याचेही 'बीबीसी'ने म्हटले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे कामकाज स्थगित करण्यात आले. अनेक संसद सदस्य सभागृहांमध्येच अडकून पडले आहेत.

बेल्जियमधील ब्रुसेल्समध्ये गेल्या वर्षी 22 मार्च रोजी आत्मघाती दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले होते. त्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच ब्रिटीश संसदेसमोर हल्ल्याची घटना घडली आहे.

Web Title: Terrorist attack infront of British sansad