पाकच्या जिव्हारी घाव

पाकच्या जिव्हारी घाव

दहशतवाद्यांवर कारवाईचा शरीफ यांचा लष्कराला आदेश
इस्लामाबाद - बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांना पाठीशी न घालण्याचा आदेश पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या लष्कराला दिला असून, मुंबई आणि पठाणकोट हल्ल्याबाबतही वेगाने चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश येत असल्यानेच शरीफ यांना ही पावले उचलावी लागत असल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान शरीफ यांनी लष्कर आणि इतर नेत्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या असून, त्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे ‘डॉन’ने म्हटले आहे. पंतप्रधान शरीफ यांनी विचारपूर्वक निर्णय घेत लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांना दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट आदेश दिल्याचेही सांगण्यात आले आहे. आदेश देताना पंतप्रधान शरीफ यांनी बंदी घातलेले ‘दहशतवादी’ असे न म्हणता. ‘व्यक्ती’ असा शब्द वापरला आहे. बैठकीदरम्यान लष्कराने किमान दोन वेळा कठोर कारवाई करण्याचे मान्य केले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांवर आणि त्यांच्या म्होरक्‍यांवर सरकारने कारवाई सुरू केल्यास लष्कराच्या नियंत्रणाखालील गुप्तचर संस्थांनी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे सांगण्यासाठी आयएसआयचे महासंचालक रिझवान अख्तर आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर जन्जुआ हे देशभर दौरा करणार आहेत. याशिवाय, पठाणकोट हल्ला प्रकरणाची चौकशी तातडीने संपवावी आणि मुंबई हल्ल्याबाबतची थांबलेली सुनावणी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेशही पंतप्रधान शरीफ यांनी दिले आहेत. शरीफ यांच्या नव्या भूमिकेमुळे अनेक स्तरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 
पाकिस्तानच्या भूमिकेला चीनने वरकरणी पाठिंबा दिला असला, तरी पाकिस्तानने भूमिका बदलावी असा त्यांचा आग्रह असल्याचे सूत्रांनी सांगितले. जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या भारताच्या मागणीला संयुक्त राष्ट्रसंघात तांत्रिक अडथळा आणण्यासही चीन तयार असला, तरी असे सातत्याने करण्यामागील तर्क काय, असा सवालही चिनी नेतृत्वाने पाकिस्तानला विचारला आहे.  

जागतिक दबावाचाच परिणाम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान शरीफ यांच्यासह काही निवडक लोकांसमोर जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या स्थितीची माहिती दिली. जगासमोर पाकिस्तान मांडत असलेल्या भूमिकेला प्रमुख देशांचा विरोध असल्याने राजनैतिक स्तरावर पाकिस्तान एकटा पडत चालला असल्याची वस्तुस्थिती चौधरी यांनी मांडली. अमेरिकेबरोबरील संबंध वेगाने बिघडत असून, दहशतवादी हक्कानी नेटवर्कवर कारवाईची अमेरिकेची मागणी कायम असल्याने हे संबंध आणखीनच बिघडण्याची दाट शक्‍यताही वर्तविण्यात आली. पठाणकोट हल्ल्याचा वेगाने तपास आणि या हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशे महंमदवर कारवाई या भारताच्या मागण्या पूर्ण करण्याबाबतही जागतिक शक्तींकडून दबाव वाढत असल्याचे चौधरी यांनी बैठकीत सांगितले. चौधरी यांच्या या धक्कादायक माहितीचा परिणाम म्हणूनच शरीफ यांनी दबावाखाली येऊन आदेश दिल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com