हफीझ सईद साहेबांविरोधात गुन्हे नाहीत: पाकचे पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

पाकिस्तानमध्ये त्याच्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल, असे मला वाटत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या सैन्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.

इस्लामाबाद - मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हफीझ सईद याची  पाकिस्तानने पुन्हा एकदा पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी हफीझ सईद साहेबांविरोधात पाकिस्तानमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे.

शाहिद अब्बासी यांनी जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हफीझ सईदबद्दल हे वक्तव्य केले आहे. जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या हफीज सईदचा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्याला नुकतेच पाकिस्तानने नजरकैदेतही ठेवले होते. पण, लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याची नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली. सध्या तो पाकिस्तानमध्ये राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

पंतप्रधान अब्बासी यांनी पुन्हा एकदा हफीझची पाठराखण करत त्याला चक्क साहेब असे संबोधले आहे. अब्बासी म्हणाले, की पाकिस्तानमध्ये त्याच्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल, असे मला वाटत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या सैन्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही.

दहशतवादी गटांना अभय देत असल्याने अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येत असलेला निधी बंद करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी नुकताच पाकिस्तानवर थेट दहशतवादाला थारा देत असल्याचा आरोप केला होता. यामुळे जगभर पाकिस्तानचा चेहरा उघड झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theres no case against Hafiz Saeed sahib in Pakistan says Pakistan PM Shahid Khaqan Abbasi