तीन दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात यश - थेरेसा मे

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

मागील तीन महिन्यांत लंडनमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले असून, त्याबद्दल बोलताना पंतप्रधान मे म्हणाल्या की, इसिस आणि मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात ब्रिटन सातत्याने लढत असून, त्यामुळे या दहशतवादी संघटनांकडून ब्रिटिश नागरिकांना लक्ष्य केले जात आहे

लंडन - लंडनमध्ये शनिवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटविण्यात यश आले असून, त्यांची नावे लवकरच उघड करण्यात येतील, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज दिली.

लंडनमध्ये झालेल्या ताज्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी छापासत्र सुरू केले असून, आज आणखी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
लंडनमधील हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून सात महिला आणि पाच पुरुषांना दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी अटक केली होती. त्यातील 55 वर्षीय व्यक्तीला चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका हल्लेखोराकडे आयरिश ओळखपत्र होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. या हल्ल्यात सात जण मृत्युमुखी पडले होते, तर 48 जण जखमी झाले असून, त्यापैकी 21 जणांची प्रकृती गंभीर आहे.

मागील तीन महिन्यांत लंडनमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले असून, त्याबद्दल बोलताना पंतप्रधान मे म्हणाल्या की, इसिस आणि मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात ब्रिटन सातत्याने लढत असून, त्यामुळे या दहशतवादी संघटनांकडून ब्रिटिश नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

या पुढे दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच मे म्हणाल्या की, इराक आणि सीरियात इसिसच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.

Web Title: Three Terrorists identified