निवडणुकीचा निकाल लागताच त्याने पत्नीला केले किस !

वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अत्यंत चुरशीच्या झालेल्या कॅनडातील सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रूडू यांच्या सत्ताधारी लिबरल पक्षाने सर्वाधिक 157 जागा जिंकल्या असल्या, तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.

ओटावा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कॅनडातील सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रूडू यांच्या सत्ताधारी लिबरल पक्षाने सर्वाधिक 157 जागा जिंकल्या असल्या, तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. बहुमतासाठी 13 जागा कमी पडल्या आहेत. ट्रूडू यांनी निवडणुकीचा निकाल कळताच भर सभेत पत्नीला किस केले. त्यांचा हा क्षण सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

सत्तेसाठी गोळाबेरीज
ट्रूडू यांना पंतप्रधानपदाचा दुसरा कार्यकाळ मिळाला असला, तरी मागील वेळेप्रमाणे ऐतिहासिक बहुमत पुन्हा प्राप्त करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे इतर पक्षांशी जुळवून घेत ट्रूडू यांना सरकार स्थापन करावे लागणार असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांमध्ये ट्रूडू यांना संसदेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या वेळी संसदेतील भाषणामध्ये आपल्या नव्या सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील, याचा आराखडा ट्रूडू यांना मांडावा लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पुन्हा विजय मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्रूडू म्हणाले की, कॅनडातील नागरिकांनी विकासाच्या अजेंड्याला आणि हवामान बदलांबाबत केलेल्या कामाला पसंती दिली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते अँड्रयू शीर यांनी ट्रूडू यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. 

जगमितसिंग ठरणार ‘किंगमेकर’? 
ट्रूडू यांच्या लिबरल पक्षाला 157, विरोधी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला 121, ब्लॉक क्युडबेकॉइस पक्षाला 32, न्यू डेमोक्रॅटिक पक्षाला 24; तर ग्रीन पार्टीला तीन जागा मिळाल्या आहेत. एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. डाव्या विचारसरणीच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते (एनडीपी) जगमितसिंग हे किंगमेकर ठरण्याची शक्यहता वर्तविली जात आहे. सिंग यांनी निकालानंतर ट्रूडू यांचे अभिनंदन केले असून, आपला पक्ष संसदेत सकारात्मक भूमिका पार पाडेल, असे म्हटले आहे. एनडीपीला 2015च्या निवडणुकीत 50 जागा मिळाल्या होत्या.

Image may contain: 2 people, beard


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trudeaus Liberals win but lose majority in Canada election