ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

या मूर्ख ट्रम्प यांच्या धोरणास कोणत्याही पाश्‍चिमात्य देशाने पाठिंबा दर्शविलेला नाही. मात्र ट्रम्प प्रशासनाचा हा मूर्खपणा आम्हाला दुबळे करु शकत नाही, आमचा स्वातंत्र्य संघर्ष थांबू शकत नाही; वा आमच्या स्वातंत्र्य योध्यांच्या निर्धारावरही परिणाम होऊ शकत नाही

नवी दिल्ली - अमेरिकेकडून नुकताच "जागतिक दहशतवादी' म्हणून घोषित करण्यात आलेल्या सईद सलाहुद्दीन याने पाकिस्तानमधील एका वाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये "हिझबुल मुजाहिदीन' या त्याच्या दहशतवादी संघटनेने भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडविल्याची दर्पोक्ती केली आहे.

"आत्तापर्यंत आम्ही भारतीय लष्करास लक्ष्य केले होते. भारतीय लष्कराशी संबंधित असलेल्या संस्था वा त्यांच्या कार्यालयांसहित जवानांना लक्ष्य करण्याची मोहिम आमच्याकडून राबविण्यात आली आहे,'' असे सलाहुद्दीन याने सांगितले. सलाहुद्दीन याने काश्‍मीर खोरे हे "भारतीय लष्कराचे थडगे बनवून टाकू,' असा अहंमन्य इशाराही दिला होता.

मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून काश्‍मीरमधील हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा फुटीरतावादी म्होरक्‍या सईद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. याचबरोबर, मोदी व ट्रम्प यांच्यामधील चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये "पाकिस्तानने इतर देशांवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाक भूमीचा वापर करु देऊ नये,' असे थेट आवाहन करण्यात आले होते. यामुळे पाककडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे भारतासाठी हा अत्यंत राजनैतिक विजय मानला जात होता.

अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या घोषणेनंतर संतापलेल्या सलाहुद्दीन याने मुझफ्फराबाद येथील एका सभेमध्ये बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे मूर्ख असल्याची टीका केली. याचबरोबर ट्रम्प प्रशासन हे मूर्खपणाने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "भेट' देत असल्याचे फुत्कार त्याने सोडले होते.

"ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात कोणी अमेरिकन न्यायालयात गेल्यास हा निर्णय फेटाळला जाईल. या मूर्ख ट्रम्प यांच्या धोरणास कोणत्याही पाश्‍चिमात्य देशाने पाठिंबा दर्शविलेला नाही. मात्र ट्रम्प प्रशासनाचा हा मूर्खपणा आम्हाला दुबळे करु शकत नाही, आमचा स्वातंत्र्य संघर्ष थांबू शकत नाही; वा आमच्या स्वातंत्र्य योध्यांच्या निर्धारावरही परिणाम होऊ शकत नाही,'' असे सलाहुद्दीन याने पाकव्याप्त काश्‍मीरमधील मुझफ्फराबाद येथील या सभेत बोलताना म्हटले!

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मोदी यांच्यामध्ये आश्‍वासक चर्चा झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर असुरक्षित झालेल्या पाकिस्तानकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. "काश्‍मीरप्रश्‍नी दुटप्पी भूमिका' घेणारी अमेरिका "भारताच्या भाषेत' बोलत असल्याची टीका पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.

"पाकिस्तानने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात लढण्यासंदर्भात कायमच कटिबद्धता दर्शविली आहे. या संकटाचा सामना करताना पाकिस्तानने मनुष्यबळ व आर्थिक संपत्ती अशा दोन्ही प्रकारे मोठे बलिदानही दिले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही पाकिस्तानच्या या प्रयत्नांची दखल घेतली आहे,'' असे निवेदन पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून यानंतर प्रसिद्ध करण्यात आले होते.

या निवेदनामध्ये पाकिस्तानचा थेट उल्लेख करण्यात आल्याबरोबरच सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंदर्भातील निर्णय हादेखील भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. यामुळे पाकिस्तानी नेतृत्वाचा अक्षरश: जळफळाट झाला आहे.

Web Title: Trump Administration Idiotic, says Global Terrorist Syed Salahuddin