"ट्रम्प हे फॉलोअर्सना ब्लॉक करू शकत नाहीत'

Sakal | Saturday, 26 May 2018

ट्‌विटरवरील फॉलोअर्सच्या राजकीय मतांच्या आधारावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांना कायदेशीररीत्या ब्लॉक करू शकत नाहीत, असा निकाल येथील न्यायालयाने दिला आहे. ट्रम्प हे आपली मते आणि अनेक निर्णय जाहीर करण्यासाठी ट्‌विटरचा सर्रास वापर करतात.

वॉशिंग्टन - ट्‌विटरवरील फॉलोअर्सच्या राजकीय मतांच्या आधारावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांना कायदेशीररीत्या ब्लॉक करू शकत नाहीत, असा निकाल येथील न्यायालयाने दिला आहे. ट्रम्प हे आपली मते आणि अनेक निर्णय जाहीर करण्यासाठी ट्‌विटरचा सर्रास वापर करतात. त्यांचे ट्‌विटरवर पाच कोटी वीस लाख फॉलोअर्स आहेत. ट्रम्प यांनी आपल्याला त्यांच्या खात्यावरील फीड पाहण्यास बेकायदा बंदी आणल्याचा दावा सात जणांच्या एका गटाने केला होता. एखादी सरकारी पदावरील व्यक्ती तिच्या ट्‌विटर अकाउंटवर राजकीय मतांच्या आधारावर दुसऱ्या व्यक्तीला ब्लॉक करू शकते का आणि ही सरकारी पदावरील व्यक्ती अमेरिकेचे अध्यक्ष असतील, तर उत्तर वेगळे असेल काय? असे सवाल याचिकाकर्त्यांनी केले होते. या दोन्ही प्रश्‍नांचे उत्तर "नाही' असे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्यांना ब्लॉक करण्याची त्यांची पद्धत बेकायदा असल्याचे यावरून सिद्ध झाल्याचे याचिकाकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. अमेरिकेच्या न्याय विभागाने मात्र या निर्णयावर असहमती दर्शविली असून, वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.