शांतता प्रस्थापित करण्याची ही दुर्मिळ संधी : ट्रम्प

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

आपण सर्वांनी एकत्रपणे काम केले तरच त्या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व अरब देशांचे सहकार्य आपल्याला मिळाले आहे. त्याचा फायदा आपण करायला हवा. 

तेल अवीव : आखाती देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची दुर्मिळ संधी सध्या निर्माण झाली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. सौदी अरेबियाचा दौरा संपवून त्यांनी आज इस्राईलला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. इस्राईलबरोबर असलेले 'अतूट मैत्रीच्या' संबंधांवर विश्‍वास व्यक्त करण्यासाठी येथे आलो असल्याचे ट्रम्प या वेळी म्हणाले.

ट्रम्प म्हणाले, "मला आशेचा नवा किरण दिसत आहे. आखाती प्रदेशामध्ये शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याची दुर्मिळ संधी निर्माण झाली आहे. मात्र, आपण सर्वांनी एकत्रपणे काम केले तरच त्या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व अरब देशांचे सहकार्य आपल्याला मिळाले आहे. त्याचा फायदा आपण करायला हवा.'' इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. दोन देशांमधील अतूट मैत्रीवर विश्‍वास ठेवल्याबद्दल त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अरब देशांचे सहकार्य मिळविण्याच्या ट्रम्प यांच्या कृतीचे स्वागतही नेतान्याहू यांनी केले. ते म्हणाले, "अमेरिका ज्या शांततेची आशा करत आहे, त्या शांततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही मागत असलेली शांतता शाश्‍वत आहे. यामध्ये ज्यू देशाला सर्वमान्यता मिळणे, इस्राईलच्या हातात सुरक्षा असणे आणि संघर्ष कायमस्वरूपी संपून जाणे, हे अपेक्षित आहे. या दृष्टीने ट्रम्प यांचा दौरा महत्त्वपूर्ण आहे.''

Web Title: trump marks rare opportunity to establish peace