अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात 49 वर्षीय न्यायाधीश

पीटीआय
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मूळचे कोलोरॅडोमधील असलेले 49 वर्षीय नील हे सर्वोच्च न्यायालयावर नामांकन करण्यात आलेले गेल्या 25 वर्षांतील सर्वांत तरुण न्यायाधीश आहेत.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुराणमतवादी न्यायाधीश नील गॉरस्यूख यांचे नामांकन केले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी या निवडीला कडाडून विरोध केला आहे. 

मूळचे कोलोरॅडोमधील असलेले 49 वर्षीय नील हे सर्वोच्च न्यायालयावर नामांकन करण्यात आलेले गेल्या 25 वर्षांतील सर्वांत कमी वयाचे न्यायाधीश आहेत. नील गॉरस्यूख हे 'टेन्थ सर्किट'साठीच्या अमेरिकन अपिलीय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. 

"न्यायमूर्ती नील गॉरस्यूख यांचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नामांकन जाहीर करताना मला अभिमान वाटत आहे," असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ईस्ट रूममधून ही महत्त्वपूर्ण घोषणा करताना सांगितले. 
विरोधकांच्या निदर्शनांवर ट्रम्प यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "नॅन्सी पेलोसी आणि नक्राश्रू गाळणारे चक शुमर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्यांवर मोर्चा काढला. परंतु जसे डेमॉक्रॅटिक पक्षात होते तसेच त्यांच्या या गोंधळाचा उपयोग झाला नाही."

घोषणा केल्यानंतर ट्रम्प म्हणाले, "अमेरिकन सर्वोच्च न्यायालयासाठी मी केलेले न्या. नील गॉरस्यूख यांचे नामांकन तुम्हाला आवडले असेल अशी आशा आहे. सर्वजण आदर करतात अशी ती एक चांगले आणि हुशार व्यक्ती आहे."
 

Web Title: Trump nominates Neil Gorsuch for Supreme Court