अमेरिकेत येणाऱ्या मुस्लिम नागरिकांवर येणार निर्बंध

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

इराक, इराण, सुदान, सोमालिया, सीरिया, लीबिया आणि येमेन या देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या निर्वासित व व्हिसा धारकांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरित वा निर्वासितांच्या संख्येवर निर्बंध आणण्यासंदर्भातील "एक्‍झिक्‍युटिव्ह ऑर्डर'वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच स्वाक्षरी करणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची कडक तपासणी करण्यात यावी, अशी भूमिका अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी अनेकदा मांडली होती. या पार्श्‍वभूमीवर, स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासंदर्भातील हे पाऊल ट्रम्प लवकरच उचलतील, अशी अटकळ बांधण्यात आली आहे.

स्थलांतरितांचे प्रश्‍न अमेरिकेमधील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या (होमलॅंड) अखत्यारीमध्ये येतात. ट्रम्प हे या मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांशी आज (बुधवार) संवाद साधणार आहेत. त्यांनी स्वत: ट्विटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. ""राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील चर्चेसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. यावेळी अनेक बाबींवर चर्चा होईल. यांमध्ये अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात आणल्या जाणाऱ्या निर्बंधांचाही समावेश असेल,'' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराक, इराण, सुदान, सोमालिया, सीरिया, लीबिया आणि येमेन या देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या निर्वासित व व्हिसा धारकांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. ट्रम्प यांच्या या आदेशानुसार अमेरिकेत पुढच्या चार महिन्यांच्या काळात स्थलांतरित वा निर्वासितांना स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात येईल. सीरियामधून येणाऱ्या निर्वासितांचासुद्धा यामध्ये अपवाद नसेल.

केवळ धार्मिक अत्याचारामुळे विशिष्ट देशामधून पलायन केलेल्या अल्पसंख्यांकानाच या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये प्रवेश देण्यात येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. या तरतुदीअन्वये मुस्लिम बहुसंख्यांक देशांमधील अत्याचारामुळे पलायन केलेल्या ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांना अमेरिकेमध्ये प्रवेश देता येईल.

Web Title: Trump to put limits on refugees, immigration