'बाय अमेरिकन, हायर अमेरिकन'वर स्वाक्षरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

ट्रम्प यांच्या मते, या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेच्या नोकऱ्या हिरावल्या जात होत्या आणि ते थांबवण्यासाठी अध्यादेश काढावा लागला

वॉशिंग्टन - स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणाऱ्या बाय अमेरिकन हायर अमेरिकन या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्वाक्षरी केली. अधिक वेतन आणि कुशल कर्मचाऱ्यांनाच अमेरिकेतील एच 1 बी व्हिसा दिला जाणार आहे. या अध्यादेशामुळे भारतीय आयटी कंपन्यांना धक्का बसला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान एच 1 बी व्हिसाचा दुरपयोग रोखण्याचे आश्‍वासन दिले होते. या नवीन निर्णयामुळे सर्वाधिक परिणाम भारतीय आयटी कंपन्यावर पडणार आहे. ट्रम्प यांनी विस्कॉन्सिनरमध्ये स्नॅप ऑन टूलच्या मुख्यालयात विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या नवीन आदेशनंतर या व्हिसातील दुरुपयोगाबाबत आढावा घेतला जाणार आहे. भारतीय आयटीयन्समध्ये एच-1 बी व्हिसा लोकप्रिय आहे. यामुळे भविष्यात भारतीय आयटीयन्सला अमेरिकेत नोकरी करणे कठीण जाणार आहे. ट्रम्प यांच्या मते, या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेच्या नोकऱ्या हिरावल्या जात होत्या आणि ते थांबवण्यासाठी अध्यादेश काढावा लागला.

या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकी आणि भारतीय आयटी कंपन्यांना कमी वेतनात कर्मचारी मिळत होते. अशा स्थितीत कंपन्या अमेरिकी कर्मचाऱ्यांना जादा वेतन देण्यापेक्षा कमी वेतनात काम करणाऱ्या परदेशातील कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यास प्राधान्य देत असत. एका आकडेवारीनुसार 80 टक्के कर्मचाऱ्यांना ठरलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन दिले जाते. अमेरिकेत दरवर्षी 85 हजार परदेशी नागरिकांना एच-1 बी व्हिसा दिला जातो. यात सर्वाधिक संख्या भारतीय आयटीयन्सची आहे.

दीडशे अब्ज डॉलरचा उद्योग
भारतीय आयटी उद्योग दीडशे अब्ज डॉलरचा आहे. भारतीय आयटी कंपन्यांना गेल्यावर्षी सुमारे 65 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे. अशा स्थितीत आयटी कंपन्यात अमेरिकी कर्मचारी नियुक्त केला तर त्यांना अधिक नुकसान सोसावे लागत होते. तसेच त्यांच्या नफ्यातही घट नोंदली जात होतीी.

Web Title: Trump signs ‘buy American, hire American’ order