विकीपीडियावरील बंदी तुर्कस्तानमध्ये कायम

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

अंकारा : ऑनलाइन एनसायक्‍लोपीडिया विकीपीडियाच्या संकेतस्थळावर घातलेली बंदी उठविण्यास तुर्कस्तानमधील न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या प्रकरणामुळे तुर्कस्तानमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

विकीपीडिया चालविणाऱ्या विकीमीडिया फाउंडेशनने न्यायालयात विकीपीडियावरील बंदीला आव्हान दिले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी काही प्रकरणांमध्ये त्यावर नियंत्रण आणायला हवे, असे न्यायालयाने विकीपीडियाचे आव्हान फेटाळताना स्पष्ट केले. तुर्कस्तानच्या दूरसंचार नियामक संस्थेने गेल्या आठवड्यात विकीपीडियाचे संकेतस्थळ बंद केले. यामागे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या संकेतस्थळांवर कारवाई सुरू असल्याचे कारण देण्यात आले होते. 

विकीपीडियावरील दोन लेखांमध्ये तुर्कस्तानचे मुस्लिम दहशतवादी गटांशी असलेले संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे विकीपीडियावर बंदी घालण्यात आली, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. विकीपीडिया देशाविरोधात अपप्रचाराची मोहीम राबवत असल्याने संकेतस्थळावर बंदी घालण्यात आली आहे, असे दूरसंचार मंत्रालयाने म्हटले आहे. तुर्कस्तान सरकारने संकेतस्थळावरील बंदी काढून टाकावी, अशी मागणी विकीपीडियाने केली आहे.

Web Title: Turkey to continue ban on Wikipedia