तुर्कस्तान:4 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये 1000 पेक्षाही जास्त लष्करी कर्मचारी व सुमारे 500 प्राध्यापकांचा समावेश आहे. याच वटहुकूमांतर्गत सरकारने याआधी हकालपट्टी केलेल्या 236 नागरिकांना पुन्हा कामावर घेतले आहे

इस्तंबूल - तुर्कस्तानमधील सरकारने दोन नवीन वटहुकूम काढत चार हजारपेक्षाही जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ केले आहे. याचबरोबर दुसऱ्या वटहुकूमांतर्गत सरकारने रेडिओ वा टीव्हीच्या माध्यमामधून चालविल्या जाणाऱ्या "डेटिंग'च्या कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे.

बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये 1000 पेक्षाही जास्त लष्करी कर्मचारी व सुमारे 500 प्राध्यापकांचा समावेश आहे. याच वटहुकूमांतर्गत सरकारने याआधी हकालपट्टी केलेल्या 236 नागरिकांना पुन्हा कामावर घेतले आहे.

दुसऱ्या अन्य काही बाबींवर बंदी घालत सरकारने प्रामुख्याने रेडिओ वा टीव्हीच्या माध्यमामधून "मित्र वा साथीदार' शोधण्यास मदत करणारे कार्यक्रम बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. तुर्कस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या लष्करी बंडाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर येथील सरकार प्रामुख्याने वटहुकूमांच्या सहाय्याने कारभार करत आहे.

बंडाच्या प्रयत्नानंतर देशामध्ये 47 हजारांपेक्षाही जास्त नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सध्या अमेरिकेमध्ये असलेले मौलवी फेतुल्लाह ग्युलेन यांनी बंडाची फूस दिल्याचा आरोप तुर्कस्तान सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र ग्युलेन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

Web Title: Turkey purges 4,000 civil servants