चार दिवसांचा आठवडाच उत्तम आहे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 job working four days instead of five

चार दिवसांचा आठवडाच उत्तम आहे!

लंडन : चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा... चांगला आहे,’ अशी प्रतिक्रिया ब्रिटनमधील कंपन्यांनी दिली आहे. येथील ‘फोर डे विक ग्लेबल’ या समाजसेवी संस्थेने ‘चार दिवस काम’ ही पथदर्शी योजना राबविली आहे. त्यात भाग घेतलेल्या कंपन्यांमधून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यासंबंधीचा सर्व्हे मंगळवारी (ता.२०) जाहीर झाला. या योजनेनुसार चार दिवस कामासाठी वेळापत्रक आखलेल्या ब्रिटनमधील ७० कंपन्यांपैकी ७८ टक्के कंपन्यांनी या व्यवस्थेत चांगले किंवा सुरळीत काम होत असल्याचा अभिप्राय दिला आहे. केवळ दोन टक्के कंपन्यांनी अशा पद्धतीने काम करणे हे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. पण बहुतेक (८८ टक्के) कंपन्यांच्या मते आठवड्यातून चार दिवस व्यवस्थित काम होत आहे.

चार दिवसांचा कामाचा आठवडा ही काही गंमतीची गोष्ट नाही. कॅलिफोर्नियाच्या खासदारांनीही राज्यात काही कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबविण्यावर विचारमंथन केले होते, पण नंतर ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आणि त्यांना कंपनीत काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कमी दिवसांचा आठवडा ही योजना उत्तम योजना असल्याचे अमेरिकेतील ‘ग्रार्टमनर’ या तंत्रज्ञानविषयक संशोधन आणि सल्लागार कंपनीने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

योजनेचे स्वरुप

 • सहा महिन्यांची पथदर्शी योजना

 • जगभरातील डझनभर देशांमधील १८० कंपन्यांचा सहभाग

 • कर्मचाऱ्यांसाठी चार दिवस, ३२ तास कामाचे नवे वेळापत्रक

 • कामाचे तास कमी झाले तरी वेतनात कपात नाही

 • ब्रिटनमधील तीन हजार ३०० कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून योजनेचा आढावा

 • ‘फोर डे विक कॅम्पेन, ‘ॲटोनॉमी’ हा विचारवंतांचा गट तसेच बोस्टन महाविद्यालय, कॅंब्रिज विद्यापीठ व ऑक्सफर्ड विद्यापीठ येथील संशोधकांच्या माहितीच्या आधारे योजना संयुक्तपणे कार्यरत

 • ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि कॅनडात ही योजना सुरू

 • ब्रिटनमधील शिक्षण, प्रसारमाध्यमे, आदरातिथ्य क्षेत्र आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी

सर्वेक्षणातील निष्कर्ष

 • पथदर्शी योजनेचा कालावधी नोव्हेंबरमध्ये संपल्यानंतरही ही योजना पुढे सुरू ठेवणार असल्याचे ब्रिटनमधील सहभागी कंपन्यांपैकी ८६ टक्के आस्थापनांचा विचार

 • कर्मचाऱ्यांची उत्पादकता सुधारल्याचे ४९ टक्के कंपन्यांना सांगितले

 • उत्पादकता स्थिर राहिल्याचे ४६ टक्के कंपन्यांना वाटते

 • पाच दिवसांच्या नियमित वेळेतील काम चार दिवसांत करण्याचे आव्हान

आयटीसारख्या क्षेत्रात अशा सवलती देणे सहज शक्य आहे, मात्र उत्पादन किंवा अन्य क्षेत्रात ते शक्य नाही. त्यामुळे नियम म्हणून याला स्वीकारार्हता मिळणे आणि ते लागू केला जाणे आपल्या देशात शक्य वाटत नाही. अर्थात, क्षेत्रानुसार आणि कंपन्यांच्या वैयक्तिक पातळीवर अशी कामकाजाची पद्धत रुजत आहे, ती अधिक विस्तारू शकते. कोरोना संकटामुळे कामकाजाची नवी संस्कृती रुजली आहे, त्याचे हे पुढचे स्वरूप असेल.

- सुचेता फाटक, संचालक,मनुष्यबळ विभाग, रेझिलिंक सोल्युशन्स प्रा. लि. पुणे

कर्मचाऱ्यांच्या वार्षिक रजेच्या काळात या योजनेनुसार काम करणे कठीण होणार आहे. पण कर्मचारी खूष आहेत. जेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे व जेथे पाच किंवा सात दिवस काम करण्याची गरज आहे, तेथे ही योजना राबविण्यास अडचणी येऊ शकतात. अशा ठिकाणी बारकाईने नियोजन करावे लागेल.

-निस्सी रसेल, व्यवस्थापकीय संचालक, वॉटरवाईज

हा प्रयोग आपल्याकडे राबवणे कठीण आहे. आठवड्यात चार दिवस काम करून तीन दिवसांच्या सुटीनंतर पुन्हा कामावर येण्याच्या पद्धतीने कंटाळा येण्याची मानसिकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पद्धत आपल्या देशात मान्य होणार नाही.

-जगदीश कुलकर्णी, प्रमुख मनुष्यबळ विभाग, टेक्सॉल इंजिनिअरिंग

टॅग्स :jobworkerschemes