युद्धात युक्रेनचाच विजय होणार

‘नाटो’ला विश्‍वास; रशियाचे हल्ले थंडावल्याचा दावा
‘नाटो’मध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा करताना फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि अध्यक्ष सॉली निनिस्तो.
‘नाटो’मध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा करताना फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि अध्यक्ष सॉली निनिस्तो.Sakal

बर्लिन - युक्रेनमधील रशियाची आगेकूच थंडावली असून हे युद्ध युक्रेनच जिंकेल, अशी शक्यता वाढली आहे, असे ‘नाटो’ने आज सांगितले. रशियाच्या आक्रमणाची धार आता बोथट झाली असल्याचे मत ‘नाटो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. रशिया-युक्रेन युद्धाच्या आजच्या ८१ व्या दिवशी रशियाचे युक्रेनच्या पूर्व भागावर हल्ले सुरुच राहिले. मात्र, खारकिव्ह आणि इतर अनेक ठिकाणी रशियाचे हल्ले मंदावले असून युक्रेनच्या सैनिकांनी अनेक गावे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. त्यातच फिनलंड आणि स्वीडन या देशांनीही ‘नाटो’चे सदस्यत्व घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याने रशियाने संताप व्यक्त केला आहे. स्वीडन आणि फिनलंडला पाठिंबा देण्यासाठी ‘नाटो’च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची आज बर्लिन येथे बैठक झाली. यावेळी या संघटनेचे उप सरचिटणीस मिर्सिया जिओना यांनी रशियाची आगेकूच थंडावल्याचा दावा केला. ‘रशियाच्या हल्ल्याची तीव्रता कमी झाली आहे. आम्हाला युक्रेनच्या सैनिकांच्या आणि नागरिकांच्या धाडसावर पूर्ण विश्‍वास आहे. आमच्या सहकार्याने युक्रेनच हे युद्ध जिंकेल, असा आम्हाला विश्‍वास आहे,’ असे जिओना यांनी सांगितले.

‘नाटो’त सहभागी होणार : फिनलंड

पुतीन यांच्या धमकीनंतरही त्यांचा शेजारी देश असलेल्या फिनलंडने ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे रशियाविरोधातील युरोपीय आघाडीला बळ मिळणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये ब्रुसेल्स शहरातील नाटोच्या मुख्यालयात सदस्यत्व मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्‍वास फिनलंडने व्यक्त केला आहे.

मारिउपोलमध्ये स्पर्धा भरवू : झेलेन्स्की

किव्ह : युरोव्हिजन संगीत स्पर्धेत युक्रेनचा विजय झाल्याने आनंदित झालेले या देशाचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी, ‘एक दिवस मारिउपोल शहरात ही स्पर्धा आयोजित करू,’ असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • खारकिव्हमधून रशियाची पिछेहाट

  • पूर्वेकडील बहुतांश दोन्बास भागावर रशियाचे नियंत्रण

  • पूर्व भागात तीव्र हल्ले असतानाही सहा गावे ताब्यात घेतल्याचा झेलेन्स्कींचा दावा

  • युक्रेनमध्ये अन्नधान्याचे संकट येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com