Breaking: इंग्लंडच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 5 January 2021

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यूनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतामध्ये येणार होते.

नवी दिल्ली- भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यूनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारतामध्ये येणार होते. पण, त्यांच्या देशातील कोरोनाची स्थिती पाहता त्यांनी भारत दौरा रद्द केला आहे. जॉन्सन यांनी 26 जानेवारीला गणतंत्र दिनादिवशी भारतात येण्याचं निमंत्रण स्वीकारलं होतं. 

इंग्लडमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन दिसून आला आहे. हा नवा स्ट्रेन जास्त गतीने पसरत असून झपाट्याने लोकांना कोरोनाची लागण होत आहे. देशातील स्थिती गंभीर बनत असल्याचं पाहून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात देशामधील स्थिती हातळण्यासाठी त्यांनी भारतात येण्याचं निमंत्रण नाकारलं आहे. 26 जानेवारीला प्रजासत्तादिनी बोरिस जॉन्सन मुख्य अतिथी म्हणून येणार होते. 

ममतादीदींना आणखी एक धक्का; क्रीडा मंत्र्यांच्या राजीनाम्यावर दिली प्रतिक्रिया

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सोमवारी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले की, येणारे काही आठवडे आतापर्यंतचे कठीण आठवडे असतील मात्र माझा विश्वास आहे की आपण या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.

कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडल्यानंतर तिथे अत्यंत गतीने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक रुग्णांची भर या आठवड्यात झाली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखीन बिघडून हाताबाहेर जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United Kingdom PM Boris Johnson cancels visit to India later this month: Reuters